दिलीप वेंगसरकर हे माझे हिरो आणि आदर्श आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्यानंतर मी केवळ त्यांच्याखातर दोन शस्त्रक्रियांमधून वेळ काढून आलो, असे प्रतिपादन विख्यात कॅन्सर सर्जन आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक शैलेश श्रीखंडे यांनी केले.
ड्रीम ११ कप या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ओव्हल मैदानातील ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर ड्रीम ११ कप या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास येऊ शकाल का, असा वेंगसरका यांचा मला फोन आला आणि मी तात्काळ त्यांना हो म्हणून सांगितले. मी देखील आय.ई.एस. स्कूल साठी शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळलो असल्याने आणि दिलीप वेंगसरकर या व्यक्ती बद्दल प्रचंड आदर असल्याने मी येथे आलो.
ते म्हणाले, क्रिकेट मधील आपल्या अप्रतिम कारकिर्दी नंतर या व्यक्तीने युवा क्रिकेटपटूंसाठी जे अप्रतिम कार्य केले आहे त्याला खरोखरच तोड नाही. त्यामुळेच दोन शस्त्रक्रियांमध्ये थोडा वेळ काढून मी आज यथे आलो आहे. क्रिकेट खेळायला मैदानात उतरल्यानंतर खेळपट्टी, वातावरण या साऱ्याना दोष न देता प्रत्येक वेळी आपली सर्वोत्तम खेळी करायला हवी कारण हीच गोष्ट आपल्या उर्वरित आयुष्यात देखील उपयोगी ठरते. आम्ही आज देखील प्रत्येक शस्त्रक्रिया करताना आपले सर्व ज्ञान पणाला लावतो तेव्हांच त्या यशस्वी होतात असे श्रीखंडे यांनी सांगितले.
वेंगसरकर यांनी यावेळी बोलताना आपल्या फलंदाजीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या हर्ष गायकर आणि आयुष शिंदे यांनी शेवटपर्यंत नाबाद राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जेव्हां एखाद्या फलंदाजांचा जम बसतो त्यावेळी आपली विकेट फेकून परतण्यापेक्षा संघाला विजयी करून परतणे हेच महत्वाचे असते असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीने क्रिकेट मंत्रा अकादमी संघावर ८ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्यांना डॉ. श्रीखंडे आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हे ही वाचा:
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!
…म्हणे भाजप संविधान बदलणार आहे !
न्याय संहिता, गरिबांना घरे, मोफत अन्न, नोकऱ्यांची हमी…. भाजपचा जाहीरनामा मोदींनी केला घोषित!
संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन!
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट मंत्रा अकादमी संघाने निर्धारित ३५ षटकांत ५ बाद १८३ धावांचे लक्ष्य उभारले. ४ बाद ७१ वरून आयुध मोहंती (नाबाद ४५) आणि वंश चुंबळे (५०) या जोडीने पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागी रचली. आलेख सिंग याने ४१ धावांत २ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या यश जगताप (२६) आणि अस्मित झा (३७) या सलामीच्या जोडीने ६२ धावांची सलामी दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर आयुष शिंदे (नाबाद ५१) आणि हर्ष गायकर (नाबाद ६०) या जोडीने जबरदस्त फटकेबाजी करीत केवळ १३ षटकांतच १०७ धावांची अभेद्य भागीदारी करून २८ षटकांतच संघाचा विजय साजरा केला. हर्ष गायकर याने केवळ ३२ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ६० तर आयुष शिंदे याने ५५ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून हर्ष गायकर याची निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक – क्रिकेट मंत्रा अकादमी – ३५ षटकांत ५ बाद १८३ (श्रीहन हरिदास २२, समृद्ध भट २०, आयुध मोहंती नाबाद ४५, वंश चुंबळे ५०; आलेख सिंग ४१ धावांत २ बळी ) पराभूत विरुद्ध ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – २८ षटकांत २ बाद १८४ (यश जगताप २६, अस्मित झा ३७, आयुष शिंदे नाबाद ५१, हर्ष गायकर नाबाद ६०).