उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रचारार्थ कांदिवली पूर्वमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संकल्प मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उत्तर मुंबईचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, आपल्याला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करायचे आहेत. त्यासाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपल्याला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कांदिवली पूर्व विधानसभेतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, आरपीआय (आठवले गट), रासपच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कांदिवली पूर्वमधील आकुर्ली रोड येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर, कप्तान अभिजीत अडसूळ यांच्यासह महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कांदिवली पूर्व विधानसभेतील उद्धव ठाकरे गटाचे शाखा क्रमांक २९ चे उप शाखाप्रमुख अमोल शिंदे, उप शाखाप्रमुख कीर्ती ढाले, उप शाखाप्रमुख राशी दगलीया, गट प्रमुख प्रियांका चौहान, वर्षा राजगुरू, विराज सावंत, अमित मगदूम, हेमंत पाटील, नरेश चौहान या पदाधिकाऱ्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांना पुढील वाटचालीस गोयल यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश जी प्रगती करत आहे त्यात महाराष्ट्र आणि मुंबईचे योगदान मोठे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती तयार झाली आहे. महायुतीचे सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे. येणाऱ्या काळात ही महायुती अधिक मजबूत होणार आहे. उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई करण्यासाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद द्या, असे आवाहन गोयल यांनी केले.
खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, जगाला हेवा वाटावा असे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान कारायचे आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार असलेले पियुष गोयल यांनी यशस्वी मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री मंडळात काम केले आहे. मिळेल त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. त्यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ, असा विश्वास खा. शेट्टी यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात गोळीबार; चार जण ठार
बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी
“निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते”
मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण
आमदार अतुल भातखळकर म्हणाले, गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला पुढे नेण्याचे काम करत आहेत. आज महाराष्ट्र, मुंबईत विकासाचे प्रकल्प केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मार्गी लागले आहेत. मुंबईतील मेट्रो असेल, अंडरग्राऊड मेट्रो असेल ही कामे मोदीजी, देवेंद्र फडणवीस आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने करण्याचे काम केले आहे. झोपडपट्टीमधील रहिवासी, बिल्डिंगमध्ये राहणारा मध्यमवर्गीय, व्यापारी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केले आहे. येणाऱ्या काळात आम्ही रात्रीचा दिवस करू आणि उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार पियुष गोयल यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊ, असा विश्वास आमदार भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला.