टी-२० विश्वचषक २०२४ ची रणधुमाळी जून महिन्यात रंगणार आहे. त्याआधी पाकिस्तानी संघ न्यूझीलंडसोबत ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या दरम्यान अबोटाबादमध्ये पाकिस्तानी संघाची फिटनेस ट्रेनिंगची पद्धत चर्चेचा विषय बनली आहे. पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षणात रस्सीखेच, दगड उचलून पळत जाणे, डोंगरावर चढणे आणि बंदुकीतून गोळीबार करणे यांचा समावेश होता. या प्रकारच्या प्रशिक्षणामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.
या प्रशिक्षणाचे नक्की काय फायदे होणार आहेत, याबाबत अद्याप पाकिस्तानी बोर्डाकडून काहीही खुलासे झालेले नाहीत. मात्र हे प्रशिक्षण शिबिर सोशल मीडियावर आकर्षणाचे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट संघ लष्कराकडून प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघ क्रिकेट खेळणार आहे की, काही युद्धाची तयारी करत आहे, असे प्रश्न लोक विचारू लागले आहेत.
गन शुटिंगबाबत, पाकिस्तानच्या मीडियानेही अशा प्रशिक्षणाचा क्रिकेटच्या खेळात उपयोग काय, असे प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या प्रशिक्षणामुळे खेळाडूंना मानसिक बळ मिळेल. शरीरात लवचिकता येईल, असे सोशल मीडियावरील काही पाक चाहत्यांनी म्हटले आहे. तर टग ऑफ वॉर आणि पर्वत चढणे हा खेळ शारीरिक शक्तीशी संबंधित असू शकतो. अशा परिस्थितीत अनेक पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण चांगले असले तरी क्रिकेट प्रशिक्षण न घेतल्याने त्यांच्या खेळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
हे ही वाचा..
पंतप्रधान मोदींच्या फोटोंमुळे पालटले लक्षद्वीपचे नशीब!
प. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला
फलंदाजांच्या शरणागतीमुळे चेन्नईचा पराभव
पाकिस्तान संघ चर्चेत असताना अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहीन आफ्रिदीला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवून बाबर आझमला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुन्हा कर्णधार बनवले आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. ही मालिका १८ एप्रिलपासून सुरू होणार असून २७ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. बरं, या प्रशिक्षणाचा पाकिस्तानी संघाला फायदा झाला की नाही, हे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा निकालच सांगेल.