केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी मंगळवार, २ एप्रिल रोजी ‘न्यूज डंका’च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी पीयूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाच्या चढत्या आलेखाचा लेखाजोगा मांडला. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठीची रणनीती काय असणार आहे यावरही त्यांनी आपली मते मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवाराची घोषणा झाल्यापासून येथील लोकांचा प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. मतदार हे अपेक्षेपेक्षा जास्त आनंदी असून त्यांनी आशीर्वादही दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोकांसाठी नरेंद्र मोदी हे एक आशा आहेत. ‘नरेंद्र मोदी है तो मुमकिन है” असा विश्वास लोकांना आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देश थांबणार नाहीये. अमृतकाळात भारत देश आता विकसित बनूनच राहणार आहे. नरेंद्र मोदींवरील जनतेचा विश्वास हा कानाकोपऱ्यातून दिसून येत आहे, असे गौरवोद्गार काढत पीयूष गोयल यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभक्त आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षात भक्कम पाया रचला आहे. भारत ही आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत नक्कीच तिसरी अर्थव्यवस्था बनेल. नरेंद्र मोदींनी प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकता आणून प्रत्येक क्षेत्राला भ्रष्टाचारमुक्त केले आहे. सरकारी तिजोरीतील पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत, असं पीयूष गोयल म्हणाले.
प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान
देशातील लोक अनेक वर्षांपासून उत्तम प्रशासकाच्या शोधात होते. या शोधात जनतेला नरेंद्र मोदी लाभले आहेत. त्यांनी सरकारी पैशांचा जपून वापर करत एक एक पैशाचा हिशोब जनतेला दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक देश उपयोगी योजना, धोरणे भारतात राबविली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळाला आहे. त्यांनी महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत नारी शक्तीचा सन्मानही केला आहे, असं पीयूष गोयल यावेळी म्हणाले. लोकांना विश्वास आहे की, आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करायला नरेंद्र मोदी मदत करतील त्यामुळे आपण आता मोठी स्वप्ने पाहू शकतो. जनतेच्या मनात हा विश्वास नरेंद्र मोदींनी दिला आहे.
मुंबईचे भविष्य उज्वल
मुंबई विषयी बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, “मुंबईचे भविष्य हे उज्वल आहे. जगभरात मुंबई आपली छाप सोडणार. मुंबईला आर्थिक दृष्ट्या आणखी उच्चस्तरावर नेण्याची क्षमता मुंबईत आणि मुंबईकरांमध्ये आहे,” असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
हे ही वाचा:
‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले
यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!
तिबेट क्षेत्राला ६० भौगोलिक नावे जाहीर करा
सुशील कुमार मोदी कॅन्सरने ग्रस्त!
स्लममुक्त मुंबई हे उद्दिष्ट काय आहे?
स्लम एरियामध्ये राहणाऱ्या म्हणजेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला पक्के घर हवे असते. मात्र, दुर्दैवाने मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून असे अनेक प्रकल्प काही ना काही कारणाने रखडून पडले आहेत. यावर उपाय म्हणजे या क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येऊन या प्रकल्पांना गती द्यायला हवी. हे प्रकल्प पूर्ण झाले तर या भागातील लोकांना त्याच ठिकाणी पक्के घर मिळेल. शिवाय त्यांच्या मुलांना उज्वल भविष्य मिळेल आणि ते मिळवून देणं ही जबाबदारी आहे, असं पीयूष गोयल म्हणाले. स्लममुक्त मुंबई हे शक्य आहे आणि ते करणारचं असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.