संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान देण्याचा प्रस्ताव देण्यात आला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनला प्राधान्य द्यावे, भारताला त्यानंतर, अशी भारताची भूमिका मांडल्याचा दावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केला.परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी जवाहरलाल नेहरूंना लक्ष्य केले. पाकव्याप्त काश्मीर आणि चीनने भारतीय भूभागाचा काही भाग बळकावणे यांसारख्या समस्यांसाठी भूतकाळात झालेल्या चुका जबाबदार होत्या, असे त्यांनी सांगितले.
गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमध्ये बोलताना जयशंकर यांना भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि चीनने ताब्यात घेतलेल्या भारतीय प्रदेशांच्या स्थितीशी जुळवून घ्यायचे की ते परत मिळवण्यासाठी काम करायचे, हा प्रश्न विचारला असता, ते बोलत होते.उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही दिवसांत भाजप नेत्यांनीही नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारांनाही श्रीलंकेला कचाथिवू बेट देण्यावरून लक्ष्य केले आहे.
‘१९५०मध्ये (तत्कालीन गृहमंत्री) सरदार पटेल यांनी नेहरूंना चीनबद्दल इशारा दिला होता. पटेलांनी नेहरूंना सांगितले होते की आज पहिल्यांदाच आपण दोन आघाड्यांवर (पाकिस्तान आणि चीन) अशा परिस्थितीचा सामना करत आहोत, ज्याचा सामना भारताने यापूर्वी कधीही केला नव्हता. नेहरू म्हणाले की चिनी लोक काय बोलत आहेत, यावर त्यांचा विश्वास नाही कारण त्यांचा हेतू वेगळा आहे आणि आपण सावधगिरी बाळगली पाहिजे,’ असे जयशंकर म्हणाले.
‘नेहरूंनी पटेल यांना उत्तर दिले की तुम्ही चिनीबद्दल अनावश्यकपणे संशयी आहात. नेहरूंनी असेही सांगितले की हिमालयातून कोणीही आमच्यावर हल्ला करणे अशक्य आहे. नेहरूंनी चिनी धमकी पूर्णपणे फेटाळली होती. त्यानंतर काय झाले ते सर्वांना माहीत आहे,’ अशी आठवण त्यांनी करून दिली.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचा भारताच्या सार्वभौमत्वावर विश्वास नाही’
हिंदू देवांना शिविगाळ करून मुस्लिम मित्रांची हिंदू मुलांना मारहाण
ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष
‘इतकेच नाही तर, जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागेची चर्चा झाली आणि तो प्रस्ताव आम्हाला सादर केला जात होता, तेव्हा नेहरूंची भूमिका अशी होती की, आम्ही ती जागा घेण्यास पात्र आहोत, परंतु ती आधी चीनला मिळाली पाहिजे. सध्या आम्ही भारत प्रथम धोरणाचे पालन करत आहोत. पण एक काळ असा होता की नेहरूंनी भारत दुसऱ्या तर, चीन पहिल्या स्थानी असल्याचे म्हटले होते,’ असे ते म्हणाले.जयशंकर म्हणाले की, पटेल हे काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत नेण्याच्या बाजूने नव्हते, कारण त्यांना तेथील न्यायाधीशांची ‘मानसिकता’ माहीत होती.
‘जर तुम्हाला माहीत असेल की न्यायाधीश पक्षपाती आहेत, तर तुम्ही त्याच्याकडे न्याय मागायला जाल का? पण तेच झाले, हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत नेला गेला आणि लगेचच पाकव्याप्त काश्मीर पुन्हा घेण्याकरिता सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी खूप दबाव आला. भूतकाळातील अशा चुकांमुळे आपल्यावर अशी परिस्थिती ओढवली आहे,’ असे ते म्हणाले.
‘आज जेव्हा आपण आमच्या सीमांबद्दल बोलतो तेव्हा काहीजण म्हणतात की आमच्या सीमा पुन्हा लिहा. आमच्या सीमा अजूनही आमच्या सीमा आहेत, आपण कधीही त्यावर शंका घेता कामा नये,’ असे ते म्हणाले.गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने भूतकाळातील अनेक प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला असून, त्यातील काही प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले आहे, तर काही प्रश्नांना अजून वेळ लागेल, असे ते म्हणाले.
‘पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत आमच्याकडे संसदेचा ठराव आहे आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे,’ असे सांगत जयशंकर यांनी आज आपल्या भूमिकेबद्दल उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे, परंतु भूतकाळातील चुकांकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले.