शेख हसिना या पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्यानंतर बांगलादेशमध्ये ‘भारतावर बहिष्कार घाला’ अशी मोहीम सुरू झाली आहे. त्यावर ‘आधी तुमच्या पत्नी परिधान करत असलेल्या साड्या पेटवून दाखवा’, असे प्रत्युत्तर दिले. बांगलादेशातील विरोधी पक्ष सध्या भारतीय भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताशी चांगले संबंध असलेल्या शेख हसिना यांनी सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. हसिना यांना भारत समर्थक मानून विरोधक आणि अवामी लीगने भारताच्या मदतीमुळेच हसिना यांनी निवडणूक जिंकल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन बांगलादेशातील नागरिकांना केले आहे. त्यावर शेख हसिना यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
‘भारतावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांच्या पत्नींकडे किती भारतीय साड्या आहेत?,’ असा प्रश्न पंतप्रधान शेख हसिना यांनी गेल्या आठवड्यात उपस्थित केला होता. ‘बीएनपीचे नेते भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहेत. मग ते या वस्तू त्यांच्या बायकांकडून का घेत नाहीत?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हसिना या स्वतः साडीप्रेमी आहेत आणि त्यांनी अनेक भारतीय नेत्यांना साडीची भेटही दिली आहे. ‘जेव्हा हे नेते त्यांच्या पत्नींच्या भारतीय साड्या त्यांच्या पक्षकार्यालयासमोर पेटवून देतील, तेव्हाच भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या त्यांच्या मताशी ते किती ठाम आहेत, हे सिद्ध होईल,’ असे त्या म्हणाल्या.
बीएनपीचे अनेक नेते आणि त्यांच्या पत्नी भारतातून साड्या विकत घेऊन त्या बांग्लादेशात विकतात, असा आरोपही त्यांनी केला. ‘आपण भारताकडून गरम मसाल्याचीही आयात करतो. कांदा, आले, लसूण आणि अनेक वस्तू भारतातून आयात करतो. हे बीएनपी नेते भारतीय मसाल्याशिवाय जेवण बनवतील का? त्यांनी या मसाल्याच्या पदार्थांशिवाय जेवण बनवून त्याचे सेवन करावे. ते या पदार्थांशिवाय बनलेले अन्नपदार्थ खाऊ शकतील का, याचे उत्तर त्यांनी द्यावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.
हे ही वाचा:
अन्सारीच्या मृत्यूनंतर तुरुंग अधीक्षकाला जीवे मारण्याची धमकी!
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरमध्ये ३७० कलम लावून घोडचूक केली!
‘नावे बदलल्याने काही फरक पडत नाही’
अनियमित व्यवहार, नियमभंगामुळे काँग्रेसला साडेतीन हजार कोटींचा कर
हसिना यांच्या विजयानंतर भारतीय पदार्थ आणि वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या मागणीत घट झाली होती. अनेकांनी ताजा माल मागवण्यास नकार दिला होता. खाद्यतेल, प्रक्रिया केलेले पदार्थ, कॉस्मेटिक्स आणि कपड्याच्या विक्रीत घट झाली होती. बांगलादेशी सोशल मीडियावरही बॉयकॉटइंडियाप्रॉडक्ट, इंडियाआऊट आणि बॉयकॉटइंडिया हे हॅशटॅग ट्रेन्ड झाले होते. बीएपीचे संयुक्त सरचिटणीस रुहुल कबिर रिझवी याने काश्मिरी शाल फेकून देऊन या आंदोलनाला प्रोत्साहन दिले होते. सोशल मीडियावर भारतावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात असताना मोदी सरकारने रमझान आणि ईदच्या पार्श्वभूमीवर ५० हजार टन कांदा बांग्लादेशला पाठवण्यास मंजुरी दिली आहे.