दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीत निषेध रॅली काढली होती. यानंतर सोमवार, १ एप्रिल रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत या रॅलीत माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरीही उपस्थित होते. काँग्रेसने केलेल्या पहिल्या तक्रारीमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत, अशी टीका करत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
वायनाड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत असलेल्या राहुल गांधींवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. या मतदार संघातून इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या सीपीआयचे उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री विजयन म्हणाले, “आपल्या सर्वांना माहित आहे की राहुल हे काँग्रेस पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत. वायनाड मतदारसंघात ते कोणाविरुद्ध निवडणूक लढवत आहेत हे त्यांनी पहावे. ते सीपीआयच्या राजा यांच्या विरोधात लढत आहेत. प्रत्यक्षात काँग्रेस आणि सीपीआय हे दोघेही इंडिया आघाडीचा भाग आहेत.” विजयन असेही म्हणाले की, भाजपाशी लढण्याऐवजी ते सीपीआयच्या उमेदवाराशी लढत आहेत.
हे ही वाचा:
हिंदू रिक्षा चालकावर जमावाचा हल्ला
अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी
‘मॉस्को हल्ल्याशी संबंध असल्याचा रशियाचा आरोप धादांत खोटा’
मविआमध्ये एकोपा नाही; प्रकाश आंबेडकरांचा घाणाघात
रविवारी दिल्लीत झालेल्या रॅलीत राहुल गांधींनी भाजपावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचं सारा देश आणि भाजपाचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगातील दोन पंचही त्यांनीच निवडले. सामना सुरु होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकले. ही मॅच फिक्सिंग मोदी आणि भारतातील तीनचार सर्वात मोठे उद्योगपती करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती.