उत्तर मुंबईसाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली असून एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दीष्ट बाळगल्याचे स्पष्ट केले. पियुष गोयल म्हणाले की, उत्तर मुंबई हेच माझे कार्यक्षेत्र राहिलेले आहे. हा विभाग झोपडपट्टीमुक्त करण्याचा माझा संकल्प आहे. मुलांना चांगले जीवन जगता येईल यादृष्टीने मुंबई घडवायची आहे. मुंबईला एका प्रयोगशाळेच्या रुपात पाहायचे आहे.
भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली त्यात पियुष गोयल आणि मिहीर कोटेचा यांच्या नावांची घोषणा झाली. हे दोघेही मुंबईतून निवडणूक लढविणार आहेत. गोयल म्हणाले की, मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुपरस्पेशालिटी रुग्णालय असावे अशी माझी इच्छा आहे. सर्वसामान्यांना उपचार मिळावे असे रुग्णालय असावे असे वाटते. गोरेगाव हार्बर लाइनही वाढवायची आहे. महापालिका शाळांत इतर शाळांप्रमाणे सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहे.
त्यांनी सांगितले की, मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. अनेक निवडणुकांमध्ये मी काम केले. अनेक लोकांना निवडून आणण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. पण आता मीच उमेदवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचे स्वप्न पाहिले आहे. आम्हाला देशाला चांगली दिशा द्यायची आहे.
हे ही वाचा:
साक्षी वहिनींनंतर धोनीने उचलून घेतलेला मी बहुतेक एकटाच भाग्यवान!
टायटॅनिकमधील रोझचा जीव वाचवणाऱ्या दरवाजाची किंमत ५ कोटी
मुख्तार अन्सारीचा प्रवास; स्वातंत्र्य चळवळ, वीरचक्र मिळविणाऱ्या कुटुंबातला मुलगा ते गुन्हेगार
गरजू कैद्यांसाठी वकिलांचे ‘दर्द से हमदर्द तक’
जुन्या आठवणींनाही गोयल यांनी उजाळा दिला. ते म्हणाले की, मी या मतदारसंघात आलो तेव्हा गोपाळ शेट्टी यांच्याशी संवाद झाला. त्यांनी बोरिवलीत आमचे भव्य स्वागत केले. शाळेत जात असे तेव्हा सायनहून गाडी पकडत असे. दादरला आल्यावर चर्चगेटच्या दिशेने रेल्वे प्रवास करत असू. याठिकाणी आलो तेव्हा अनेक जुन्या मित्रांची भेट झाली. त्यामुळे खूप समाधान वाटले.
गोयल यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरे यांची उणीव आता जाणवते का, याबद्दल ते म्हणाले की, मला वाटत नाही उणीव निर्माण झाली आहे. कारण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बेस्टच आहेत. अनेक प्रकल्प रखडले होते ते पुन्हा सुरू झाले आहेत.
या निवडणुकीसाठी अद्याप शिंदे व अजित पवार यांच्या गटांची नावे आलेली नाहीत. त्याबद्दल पियुष गोयल म्हणाले की, यादी निश्चित आहे. यापूर्वी निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्याआधी उमेदवार घोषित केले जात असत आता तर खूप आगाऊ ही यादी जाहीर होत आहे. ते म्हणाले की, आम्ही यावेळी लोकसभेत ४०० पेक्षा अधिक जागा जिंकू आणि महाराष्ट्रात ४५ चा टप्पा गाठू.