देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीसाठी लवकरच सॅटेलाइटवर आधारित प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. टोल वसुलीची सध्याची पद्धत रद्द करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नितीन गडकरी यांनी मार्च २०२४ पासून महामार्गांवर टोल वसुलीची नवीन प्रणाली सुरू करण्यात येईल, याची घोषणा केली होती.
थेट बँक खात्यातून टोल कापला जाणार
महामार्गावरून प्रवास केलेल्या अंतराएवढा टोल कर त्यांच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे. गडकरी म्हणाले की, महामार्गामुळे लोकांच्या वेळेबरोबरच इंधनाचीही बचत होणार आहे. यापूर्वी मुंबई ते पुणे असा प्रवास करण्यासाठी ५ तास लागत होते. मात्र आता हा प्रवास अवघ्या २ तासात पूर्ण करता येणार आहे.
कशी असेल जीपीएस आधारित टोल प्रणाली
येत्या काळात जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणा सुरू होणार असली तरी ही नवी यंत्रणा कशी काम करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एनएचएआय जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित टोल प्रणाली सुरू करणार आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर थांबण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजी वाहनमालकांच्या बँक खात्यातून ही रक्कम कापली जाणार आहे.
स्वयंचलित नंबर प्लेट रीडर आवश्यक
जीपीएस आधारित टोल प्रणाली महामार्गावर धावणाऱ्या वाहनाच्या जीपीएस निर्देशांकाशी जुळणार आहे. वाहन कलेक्शन पॉईंटवर पोहोचताच बँक खात्यातून आपोआप टोल शुल्क कापले जाईल. ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी सर्व वाहनांना नंबर प्लेट असणे आवश्यक आहे. या नंबर प्लेटचे जीपीएसद्वारे उपग्रहावरून निरीक्षण केले जाणार आहे. यासाठी महामार्गावर स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसविण्यात येणार असून जीपीएस सक्षम नंबर प्लेट रीड करून टोल कापला जाणार आहे. यामाध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील.
हेही वाचा :
नोटांवर झोपलेल्या आसामच्या राजकीय नेत्याच्या छायाचित्रावरून वाद
अबब! आयपीएलमध्ये दोन्ही डावात मिळून ५२३ धावांचा डोंगर
नीरव मोदीचे लंडनमधील घर विकण्यास न्यायालयाची परवानगी
भारताशी शत्रुत्वानंतर एकेका थेंबासाठी मालदीव तहानलेले
फास्ट टॅगमुळे टोल नाक्यांवरील गर्दी घटली
सध्या महामार्गावर टोल वसुलीसाठी फास्ट टॅगचा वापर केला जातो. फेब्रुवारी २०२१ पासून चारचाकी वाहनांसाठी फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आला होता. त्यात आरएफआयडी तंत्रज्ञानाद्वारे टोल वसूल केला जातो. फास्ट टॅगमध्ये एक छोटी आरएफआयडी चिप आहे. ती रीड करून टोल कापला जातो. २०१८-१९ मध्ये टोल नाक्यांवर कोणत्याही वाहनासाठी सरासरी ७१४ सेकंद इतका वेळ लागत असे. फास्ट टॅग लाँच झाल्यानंतर आता फक्त ४७ सेकंदांवर आली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेबरोबरच इंधनाचीही बचत होत आहे.