भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १७ ते २२ मार्च या कालावधीत राज्यात १ लाख ८४ हजार ८४१ इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील ५ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया २० मार्च पासून सुरु झाली आहे, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २७ मार्च असा आहे, नामनिर्देशनपत्राची छाननी २८ मार्च रोजी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम ३० मार्च असा आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होईल.
आजपर्यंत रामटेक-१, नागपूर-५, भंडारा-गोंदिया-२ ,गडचिरोली-चिमुर-२ व चंद्रपूर -० इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत.
हेही वाचा..
केजरीवालांची अटक पवारांना इतकी का झोंबतेय?
‘मविआ’सोबत जमले तरचं ठाकरेंसोबत युती; नाही तर युती नाही
४० तासांचा थरार; ३५ समुद्री चाच्यांना जेरबंद करून आणले भारतात
केजरीवालांच्या अटकेवर टिपण्णी करणाऱ्या जर्मनीला भारताने सुनावले खडेबोल
भारत निवडणूक आयोगाकडून देशातील सार्वत्रिक निवडणूकांदरम्यान भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, एससीएस, भारतीय वनसेवा, राजपत्रित अधिकारी हे जनरल निरीक्षक, खर्च निरीक्षक,पोलीस निरीक्षक म्हणुन नियुक्त केले जातात. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांसाठी महाराष्ट्रातील निरीक्षक अधिका-यांचे प्रशिक्षण भारत निवडणूक आयोगाकडून ११ मार्च रोजी नवी दिल्ली येथे व आभासी प्रशिक्षण मुंबई व पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाकडून या निरीक्षक अधिका-यांची निवडणूक टप्प्यांनुसार लोकसभा मतदार संघामध्ये नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने जनरल निरीक्षक, खर्च निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघात ५ जनरल निरीक्षक, ६ खर्च निरीक्षक व ३ पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे.