रशियातील मॉस्को शहराजवळील कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री केलेल्या गोळीबारात आणि स्फोटात ६० जण ठार आणि १४५ जखमी झाले. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
शुक्रवारी रात्री कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. रशियन वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी स्फोटके फेकली. त्यामुळे या क्रोकस सिटी हॉलमध्ये मोठी आग लागली. या इमारतीमधून मोठ्या प्रमाणावर काळा धूर बाहेर पडत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. स्फोटांमुळे हॉलचे छतही कोसळू लागले होते. इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
गेल्या काही वर्षांतील रशियात झालेला हा सर्वांत भयंकर दहशतवादी हल्ला आहे. नुकतेच राष्ट्रपतिपदी निवडून आलेले व्लादिमिर पुतिन हे त्यांच्या सहकाऱ्यांकडून हल्ल्यांसंदर्भातील आणि सद्य परिस्थितीची माहिती घेत आहेत, असे रशियन सरकारतर्फे सांगण्यात आले.
या हॉलमध्ये रशियन रॉक बँड पिकनिक यांचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा हा हल्ला झाला. या हॉलमध्ये एकावेळी सुमारे सहा हजार प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. कॉन्सर्ट हॉलमधून प्रेक्षकांची सुटका करण्यात आली आहे, मात्र आगीमुळे कितीजण आत अडकले आहेत, हे समजू शकलेले नाही. हॉलमध्ये लोक भीतीने सैरावेळा पळत असून किंचाळत असल्याचे आणि मागे गोळ्यांचे आवाज ऐकू येत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे.
रशियाच्या विशेष दलाने दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र त्यांनी स्वतःला इमारतीमध्येच बंदिस्त केल्याचे रशियन प्रसारमाध्यमांनी सांगितले. तर, इस्लामिक स्टेटने त्यांचे दहशतवादी यशस्वीपणे तळावर परतल्याचा दावा केला आहे.
अनेक व्हिडीओंमधून गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. एका व्हिडीओत दोघे सशस्त्र माणसे कॉन्सर्ट हॉलमधून चालत असल्याचे दिसते आहे. तर, एका व्हिडीओत ऑडिटोरिअममधला एक माणूस दहशतवाद्यांनी आग लावल्याचे सांगत असून त्यामागे गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!
केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली
कर्नाटक: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत १७ पैकी ११ उमेदवार मंत्र्यांचे नातेवाईक!
जसे कर्म तसे फळ…. कुमार विश्वास यांचा केजरीवाल यांना टोला
रशियन प्रसारमाध्यमांनी सांगितल्यानुसार, घटनास्थळी तब्बल ७० रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया झाखारोव्हा यांनी हा भयंकर दहशतवादी हल्ला असल्याचे सांगत संपूर्ण जगाने तीव्र शब्दांत या हल्ल्यांचा निषेध करावा, असे आवाहन केले. तर, युक्रेनच्या राष्ट्रपतींचे सल्लागार मिखाइलो पोडोलयाक यांनी युक्रेनचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.