उत्तर प्रदेशातील बदायूमधील दोन हिंदू मुलांच्या हत्येतील मुख्य आरोपी साजिद याचा भाऊ जावेद याला २० मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले. पोलिस प्रशासनाने त्याची माहिती सांगणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत तो स्वतःची बाजू मांडताना दिसत आहे. मात्र या दोन मुलांची आई संगीता हिने जावेद खोटे बोलून स्वतःचा बचाव करत आहे, असा दावा केला आहे.
‘जावेद खोटे बोलत आहे. जावेदनेच साजिदला माझ्या घरी बाइकने आणले होते. हत्या केल्यानंतर साजिदने कोणाला तरी फोन केला होता. ती व्यक्ती कोण होती, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याचे फोन रेकॉर्ड तपासले पाहिजेत. त्याची माझ्यासमोर चौकशी करा,’ अशी मागणी संगीता यांनी केली. ‘जावेद सर्व काही जाणून आहे. ते कधीपासून हत्येचा कट रचत होते, हे त्यांना विचारले पाहिजे. जावेद माझ्या घरी का आला? माझी मुले कधीच बाहेर जात नाहीत आणि घरातच खेळत असतात,’ असेही त्यांनी सांगितले.
साजिदच सर्वांत प्रथम संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या घरी आला होता आणि त्याने त्याची पत्नी गर्भवती असल्याने पाच हजार रुपये देण्याची विनंती केली होती. मात्र नंतर ते खोटे असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याने दोन्ही मुलांना छतावर नेले आणि त्यांची निर्घृणपणे हत्या केली. ‘त्याने आमच्या मुलांची हत्या का केली? ते कोणाच्या सांगण्यावरून हे काम केले? पोलिसांनी जावेदला आमच्यासमोर आणावे आणि चौकशी करावी,’ अशी मागणी मुलांच्या आईने केली आहे.
हे ही वाचा:
कोइम्बतूरमधून अण्णामलाई यांना उमेदवारी देण्यामागे भाजपचा उद्देश काय?
तृणमूल काँग्रेस ‘फ्युचर गेमिंग’चा सर्वात मोठा लाभार्थी; ५४० कोटींची देणगी
आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक
मोदींची तुलना औरंगजेबाशी हा तर देशद्रोह!
या मुलांचे वडील विनोद यांनीही जावेदला फाशीची शिक्षा द्यावी आणि त्याचे घर जमीनदोस्त करावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या उर्वरित कुटुंबासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. ‘आमची मुले त्याला चांगले ओळखत होती आणि त्याला ‘भैया’ म्हणून हाक मारत असत. तो त्यांचे केस कापत असे. जावेद हा स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटे बोलत आहे. तोही दोषी आहे. त्याने त्याच्या भावाला मदत केली. त्यांच्या दुकानात काही गुंडप्रवृत्तीची माणसेही येत होती. त्यांनी स्वतःच्या मर्जीने ही हत्या केली की त्यांना त्यासाठी पैसे दिले होते, याची चौकशी करायला हवी,’ अशी मागणी त्यांनी केली.