कुरापती चीनकडून अनेकदा भारताचा भूभाग हा चीनच्या मालकीचा असल्याचे दावे केले जातात. काही दिवसांपूर्वी भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशला चीनने त्यांचा भूभाग असल्याचे सांगितले होते. या मुद्द्यावरून आता अमेरिका भारताच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आहे. अरुणाचल प्रदेश सीमाप्रश्नावर अमेरिकेने भारताला पाठिंबा देत चीनला कडक इशारा दिला आहे. अमेरिकेने म्हटले आहे की आम्ही अरुणाचलला भारतीय क्षेत्र म्हणून ओळखतो आणि वास्तविक नियंत्रण रेषेवरील चीनचा दावा नाकारतो.
चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल झांग झियाओगांग म्हणाले होते की, “अरुणाचल हा चीनचा भाग आहे.” अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेट म्हणून चीनचा दावा आहे आणि या दाव्यांच्या अंतर्गत भारतीय नेत्यांच्या भेटींवर चीन नियमितपणे आक्षेप घेतो. बीजिंगने या भागाला जंगनान असे नावही दिले आहे. यावरून अमेरिकेने चीनला फटकारले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “चीनच्या कोणत्याही एकतर्फी प्रयत्नांचा तीव्र विरोध आहे.” तसेच यूएस स्टेट डिपार्टमेंटचे मुख्य उप प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, “अमेरिका अरुणाचल प्रदेशला भारतीय क्षेत्र म्हणून मान्यता देते आणि आम्ही लष्करी किंवा नागरी व्यक्तीच्या कोणत्याही घुसखोरीला किंवा अतिक्रमणाचा तीव्र विरोध करतो.”
हे ही वाचा:
चीनची भागीदारी असलेल्या पाकमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला
जर पुन्हा औरंगजेबाशी तुलना कराल तर अन्य दोन कबरी खोदाव्या लागतील!
आरोपी साजिदची आई म्हणाली, एन्काउंटरमध्ये मुलाच्या मृत्यूचे दु:ख नाही!
नेमकं काय भोवलं ? राजकीय असंग की मनसुखच्या पत्नीचे शाप?
दरम्यान, ९ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशमध्ये १३ हजार फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा राष्ट्राला समर्पित केला होता. हा बोगदा चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे आणि सीमावर्ती भागात सैन्याच्या चांगल्या हालचाली सुनिश्चित करणार आहे. ८२५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या बोगद्यामुळे सैन्य आणि शस्त्रास्त्रांची अधिक चांगली हालचाल एलएसी बाजूच्या ठिकाणांवर होणार आहे. तसेच या काळात चीनने म्हटले होते की, भारताने बेकायदेशीरपणे उभारलेल्या तथाकथित अरुणाचल प्रदेशला त्यांनी कधीही मान्यता दिली नाही आणि त्याचा ठाम विरोध केला आहे.