ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शाहजहान शेख याच्या भावाला सीबीआयने शनिवारी अटक केली. ५ जानेवारी रोजी ईडीचे अधिकारी पश्चिम बंगालमधील संदेशखालीतील शाहजहान शेख याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेले असता त्यांच्यावर जमावाने हल्ला केला होता.
या प्रकरणी संदेशखालीतील तृणमूलच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मफुजुर मोल्ला आणि या गावातील रहिवासी सिराजुल मोल्ला यांनादेखील अटक करण्यात आली आहे. शाहजहान आणि अन्य आरोपींची चौकशी केल्यानंतर सीबीआयने शनिवारी शाहजहानचा भाऊ आलमगिर यांच्यासह तीन आरोपींना समन्स बजावले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांवरील हल्ल्यानंतर तब्बल ५५ दिवस फरार असणारा मुख्य आरोपी शाहजहान शेख याला अटक करण्यात सीबीआयला यश आले होते.
हे ही वाचा:
हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने लहान मुलाला दिला जन्म!
पंतप्रधानांनी ईडीला दिली शाबासकी, भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईबद्दल कौतुक
आयपीएल २०२४चा संपूर्ण हंगाम भारतातच!
“भाजपा-एनडीए निवडणुकीसाठी तयार”
या आठवड्यात सीबीआयने ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी शाहजहान शेख याच्या सुरक्षारक्षकासह तिघांना अटक केली होती. शाहजहान शेख फरार झाल्यानंतर संदेशखालीतील अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली होती. तसेच, शाहजहान आणि त्यांच्या साथीदारांनी जमीन बेकायदा बळकावल्याचा आरोपही केला होता. संदेशकालीतील एका महिलेने लेखी तक्रार केल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते शिबाप्रसाद हझरा उर्फ शिबू हझरा व उत्तम सरदार यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.