बहुप्रतीक्षित आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा, नवी दिल्लीतील विज्ञान भवनयेथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांनी केली. हे वर्ष जगभरात निवडणुकांचे असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केलं आहे.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. तसेच निवडणुकांचा हा कार्यक्रम कसा असणार आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. कोणत्या राज्यात किती टप्प्यात मतदान होईल, निकाल कधी लागेल, देशातील एकूण मतदार किती? नव मतदार किती? संवेदनशील मतदारसंघ किती? या सर्वांची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
देशात सात टप्प्यात होणार मतदान
- पहिला टप्पा – १९ एप्रिल
- दुसरा टप्पा – २६ एप्रिल
- तिसरा टप्पा – ७ मे
- चौथा टप्पा – १३ मे
- पाचवा टप्पा – २० मे
- सहावा टप्पा – २५ मे
- सातवा टप्पा – १ जून
४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे
लोकसभा २०२४ ची निवडणूक म्हणजे ऐतिहासिक संधी असून देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. १६ जून रोजी १७ व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे चाचणी असते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतील, असा विश्वास मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे.
भारतात यंदा ९६ कोटी ८० लाख मतदार आहेत. त्यातील १९ कोटी ७४ लाख तरुण मतदार आहेत. या तरुणांच्या मतांचा खूप मोठा वाटा या निवडणुकीत असणार आहे, असंही मुख्य आयुक्त राजीव कुमारयांनी म्हटलं आहे. देशातल्या १२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत वाढली आहे. शिवाय १०० हून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या ही २ लाख आहे. आकडेवारीनुसार, यादीत १८ हजार तृतीय पंथीय आहेत, अशीही माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे मतदान केंद्र शोधणं सोपं होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट यावरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यात आली आहेत. तसेच आरोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता याची गंभीर दखल घेण्यात आली असून स्टार कँपेनर्सना देखील नोटीस देण्यात येणार आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. कुठेही पैसा वाटप सुरू असेल किंवा गैरप्रकार सुरू असतील तर एक फोटो काढून सी विजील ऍप वर टाकण्याचा सल्ला देण्यात आला असून यावरून मोबाईलचे अक्षांश, रेखांश शोधून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटांत टीम घटनास्थळी पोहचणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा..
राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपा प्रवेश
‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणत नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना उद्देशून लिहिलं पत्र
षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत पुढील षटकाला सुरुवात न केल्यास बसणार दंड
तसेच निवडणुकीच्या वेळी मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही, असा विश्वासही निवडणूक आयुक्तांनी दिला आहे.