लॉकडाऊन आणि राज्यातील जनतेला द्यावयाच्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची कोरोनाशी चर्चा बाकी असेल. त्यानंतर ते निर्णय घेतील, अशा शब्दात चंद्रकातंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, मला कुणी तरी एक मेसेज पाठवला. सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. आता फक्त कोरोना अशी चर्चा बाकी आहे. त्यानंतर निर्णय घोषित केला जाईल, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं, असा टोला पाटील यांनी लगावला.
डोळे विस्फारतील असं पॅकेज देऊ असं एक वर्षापूर्वी कामगार मंत्री हसम मुश्रीफ म्हणाले होते. मात्र यातील फुटकी कवडीही कामगारांना दिली नाही, असा चिमटा त्यांनी मुश्रीफांना काढला. हा विषाणू लवकर संपणार नाही. काळजी घेऊन लोकांचं जनजीवन सुरळीत ठेवलं पाहिजे. प्रादुर्भाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. असंघटीत कामगारांना वर्षभरात काहीच पॅकेज देण्यात आलं नाही. त्यामुळे आता महिनाभर लॉकडाऊन करणार असाल तर कामगारांना रेशन, किराणा आणि भाजी मोफत देण्याची घोषणा करा. याची व्यवस्था न करता लॉकडाऊन करत असाल तर तो आम्हाला मान्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
मदरशांमधील मुलांचे मौलानानेच केले लैंगिक शोषण
मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’, लॉकडाऊनची घोषणा करणार?
दलित भिकारी नाही, तर दलित शिकारी आहेत
तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?
यावेळी त्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या बदलीवरून मुश्रीफ यांना टोला लगावला. शुक्ला यांच्या बदलीवर संशय व्यक्त करण्या इतका मी तज्ज्ञ नाही. ही रुटीन बदली आहे. तर तीन महिन्यांपूर्वीच व्हायला हवी होती. आपल्याकडे खूप हुशार लोकं आहेत. बदली काय असते हे त्यांना सांगावं का? असा टोलाही त्यांनी लगावला.