पंजाब-हरयाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन हिंसाचार घडवणाऱ्या आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांचे पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्याचा निर्णय हरयाणा पोलिसांनी घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली सीमेजवळ हिंसाचार घडवणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवण्यात आली असल्याचे अंबालाचे पोलिस उपअधीक्षक जोगिंदर शर्मा यांनी सांगितले.
‘आम्ही त्या समाजकंटकांची सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ओळख पटवली आहे. त्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट रद्द करावे, अशी विनंती आम्ही गृहमंत्रालय आणि दूतावासांना करणार आहोत. त्यांची छायाचित्रे, नावे आणि पत्ते पासपोर्ट कार्यालयात देण्यात आले आहेत. त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे,’ असे शर्मा यांनी सांगितले. तर, सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाग असलेल्या काही शेतकरी नेत्यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (एनएसए) तरतुदी लागू करण्याचा आपला पूर्वीचा निर्णय मागे घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे बीसीसीआयचे वार्षिक कंत्राट रद्द
तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक
जामतारामध्ये भीषण अपघात; १२ प्रवाशांना रेल्वेने चिरडले
पवार कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पॅकेज पोहोचण्याआधी लुटले जायचे!
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी व्हावी, यासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. ते दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र १३ फेब्रुवारी रोजी या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले असता, आंदोलक शेतकऱ्यांनी पंजाबमधून हरयाणादरम्यानच्या शंभू सीमेवर उभारलेल्या बॅरिकेडची नासधूस केली. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला तसेच, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. संगरूर येथील मुनाक सीमेजवळही आंदोलक हिंसक झाले होते. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी पुन्हा हिंसाचार भडकला होता. खनौरी येथे जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरयाणा पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला होता.