मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर त्यांचे सहकारी अजय बारसकर यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अजय महाराज बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले. “उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर जरांगेंकडे नसल्याने त्यांनी आरोप केले आहेत. तसेच जरांगेंनी केलेला विनयभंगाचा आरोपही खोटा असून जरांगे आता बेछूट आणि बेताल झाले आहेत,” अशी टीका बारसकर यांनी केली आहे. पुराव्यांशिवाय जरांगे आरोप करत असून लोणावळ्यातील सभेवेळी सरकारी अधिकाऱ्यांशी बंद दरवाजाआड काय डील झाली? असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
“मनोज जरांगे यांच्यापासून आंदोलन सुरु होतं आणि त्यांच्याकडेच संपते. कोणीही प्रवक्ता आपण पाहिला आहात का? जरांगे पाटील यांच्या वतीने कुठला वकील, अभ्यासक पाहिला आहे का? टीमवर्कचा पत्ताच नाही. दिवसाला तत्वज्ञान बदलत आहे. मी बलात्कार केल्याचा आरोप जरांगेंनी केला. मी विनयभंग केला असेल तर त्या महिला समोर आणून दाखवा,” अशी सणसणीत टीका त्यांनी जरांगे यांच्यावर केली आहे.
“जरांगे यांना वैयक्तिक प्रश्न विचारले का? मागे १७ दिवसांचे आंदोलन झाले तेव्हा ते रात्री कुणाच्या घरात दूध-भात खात होते? माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहेत? कोणत्या माय माऊलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले याचे पुरावे आहेत. कोणत्या माता-माऊलीला आंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिला आहे ते ही माहित आहे. पण, आमची ती संस्कृती नाही. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला,” अशी टीका करत अजय महाराज बारसकर यांनी गौप्यस्फोट केले आहेत.
हे ही वाचा:
‘महानंद’वरून पुन्हा विरोधकांची आग पाखड
“कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला”
उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडून भीषण अपघात; १५ भाविक ठार
बहीण, आईला छळणाऱ्यांना रोखणाऱ्या अल्पवयीन मुलावर गोळीबार
“तुमच्या पाहुण्याच्या दारात डंपर कसे आले? याचा तपास व्हायला हवा. रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? वाळूचा धंदा चालतो. एकाही गाडीवर नंबर नाही. संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि जरांगे यांच्यावर कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गु्न्हा पुण्यात दाखल आहे. मी चुकलो तर मी अडकणार. हिंमत असेल तर माझ्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा. सर्व पुरावे न्यायालयात सादर करणार,” असं आव्हान बारसकर यांनी दिलं आहे.