निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला नवे चिन्ह प्रदान केले. त्यांना ‘तुतारीवाला माणूस’ हे चिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
‘सादर झालेल्या विनंतीनुसार, ‘तुतारीवाला माणूस’ हे चिन्ह शरदचंद्र पवार गटाला महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघासाठी दिले जात आहे,’ असे निवडणूक आयोगाने निवेदनात नमूद केले आहे. निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ‘भिंतीवरील घड्याळ’ हे चिन्ह देऊन शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का दिला होता.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना आव्हान देऊन सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आपलाच पक्ष खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला होता.
हे ही वाचा:
कोलकत्ता उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले
शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू
“मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात”
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शरद पवार यांच्या गटाच्या १० आमदारांना अपात्र न ठरवल्याने या निर्णयाला अजित पवार गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि राज्याचे सभापती राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. यावर पुढील सुनावणी १४ मार्च रोजी होणार आहे.