राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या मनोहर जोशी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने मनोहर जोशी यांना गुरुवारी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर मनोहर जोशी यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी त्यांचे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
तळागाळातील लोकांचा आणि शिवसैनिकांचा तगडा जनसंपर्क मनोहर जोशी यांच्याकडे होता. राजकीय प्रवासातील एक एक टप्पे पार करत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पदही भूषविले. याशिवायचं मुंबईचे महापौरपद, लोकसभेचे अध्यक्ष अशी प्रतिष्ठित पदेही त्यांनी भुषविली होती. मात्र, मुख्यमंत्री पद त्यांना पूर्ण करता आले नाही. त्यामागेही वेगळी कहाणी असून त्यांच्या मुख्यमंत्री पद सोडण्याची चर्चा त्यावेळीही रंगली होती.
राज्यात पहिल्यांदाच शिवसेना- भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनवले. १९९५ मध्ये महाराष्ट्राचे ते पहिले गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री झाले. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे ते पहिले शिवसेना नेते आहेत. १९९५ साली शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधीत राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. त्यांचा कारभार चांगला सुरू असताना १९९९ साली मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्याची वेळ आली होती.
मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यावर पुण्यातील एका शाळेसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप झाला होता. याचं कारणामुळे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. मात्र, मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हाचे ते चिठ्ठी प्रकरण सर्वांसाठीचं चर्चेचा विषय ठरले होते.
मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कोणतीही कारणं न देता बाळासाहेब ठाकरे यांच्या एका पत्रावर आपले पद सोडून दिले होते. “तु्म्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करुन मला भेटायला या.” असा मजकूर बाळासाहेबांनी पत्रात लिहला होता. मातोश्रीवरुन आलेला हा आदेश वाचल्यानंतर मनोहर जोशी यांनी तात्काळ राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार!
बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला पोलीस, परंतु अधिकाऱ्याला मारलेल्या सॅल्यूटने केला घात!
पहिल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील आंदोलकांनी आमच्या मुलांना व्यसनी केले!
मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश अंतिम मानून आपले मुख्यमंत्रीपद सोडले होते. यानंतरही त्यांनी मनात कसलेही आकस न ठेवता बाळा साहेबांसोबत काम करणे सुरू ठेवले. मुख्यमंत्रीपद गेल्याबद्दल त्यांना नंतरच्या काळात प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी म्हटले की, “१९९९ साली एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला,” असं उत्तर देत त्यांनी त्यांची शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठा साऱ्या राज्याला दाखवून दिली होती.