दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून सातव्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांना गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी समन्स पाठवले आहे. त्यांना सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी, अनेकदा समन्स बजावण्यात आल्यानंतरही अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर झालेले नाहीत.
दरम्यान, ईडीने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात समन्सचे पालन न केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीच्या तक्रारीत, अरविंद केजरीवाल जाणूनबुजून समन्सचे पालन करू इच्छित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग संबंधित चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. आतापर्यंत ईडीने अरविंद केजरीवाल यांनी सात वेळा समन्स पाठवले आहे. दरम्यान, मागील समन्सवेळी आपने ईडीचे हे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.
हे ही वाचा:
भारत-चीन सीमाभागात बर्फात अडकलेल्या ५०० जणांची सुटका
शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित; किमान आधारभूत किमतीची मागणी चुकीची
लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!
बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!
ईडीने यापूर्वी २ नोव्हेंबर २०२३ रोजी अरविंद केजरीवाल यांना पहिले समन्स पाठवले होते. त्यानंतर २१ डिसेंबर २०२३ रोजी दुसरे समन्स पाठवले. पुढे ३ जानेवारी २०२४ रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना तिसरे समन्स पाठवले होते. १७ जानेवारी रोजी ईडीने चौथे समन्स पाठवले. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी ईडीने पाचवे समन्स पाठवले. १४ फेब्रुवारीला सहावे समन्स पाठवल्यानंतर ईडीने त्यांना १९ फेब्रुवारीला बोलावले, पण अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. आता २२ फेब्रुवारीला सातवे समन्स पाठवले आहे. त्यामुळे आता तरी ते हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.