आसाम पोलिसांच्या सीआयडी विभागाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह ११ काँग्रेसनेत्यांना समन्स पाठवले आहे. त्यानुसार, त्यांना २३ फेब्रुवारी रोजी विभागासमोर हजर राहायचे आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान गुवाहाटीमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, जितेंद्रसिंह अलवर, आसाम काँग्रेसचे अध्यक्ष भूपेनकुमार बोरा, खासदार गौरव गोगोई, आसाम विधानसभेचे विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया आणि अन्य काहीजणांची चौकशी केली जाईल.
यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीवी श्रीनिवास आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे प्रभारी कन्हैया कुमार यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. ‘काँग्रेस नेत्यांविरोधात राज्यभरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. आम्ही या विरोधात दाद मागावी, असे आम्हाला सांगितले जात आहे. विशेष तपास गटाची स्थापनाही करण्यात आली आहे आणि आता सीआयडीने बोलावले आहे,’ अशी माहिती देबब्रत सैकिया यांनी दिली.
हे ही वाचा:
संदेशखालीचे वार्तांकन करणाऱ्या टीव्ही पत्रकाराला अटक
महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली संदेशखालीतील पीडितांची भेट!
चंडीगडच्या महापौरपदाच्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे!
भारतीय लष्करासाठी टाटा समूहाने बनवला उपग्रह
ही सर्व प्रकरणे एकत्र ठेवून आम्हाला चौकशीसाठी बोलावता आले असते, मात्र तसे करण्यात आलेले नाही. विरोधी पक्षांना त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. याआधी एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्या विरोधात जातीय टिप्पणीप्रकरणात गुन्ह्याची नोंद आहे. तेव्हा पोलिसांनी सर्व प्रकरणे एकाच ठिकाणी नोंदवली होती. आता मात्र ते आम्हाला इथे तिथे बोलावून आमचा अपमान करत आहेत, त्यांचा हेतू स्पष्टपणे दिसतो आहे, असा आरोप त्यांनी केला.