टाटा समूहाने भारतीय लष्करासाठी मोठी कामगिरी केली आहे. भारतीय लष्कराच्या मदतीसाठी एक उपग्रह टाटा समुहाने तयार केला आहे. एखाद्या खासगी कंपनीने तयार केलेला हा भारताचा पहिला लष्करी दर्जाचा गुप्तचर उपग्रह आहे. लवकरच हा उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या रॉकेटमधून हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये हा उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.
वृत्तानुसार, लष्करासाठी फायद्याचा ठरणारा हा उपग्रह टाटा समूहाची कंपनी असलेल्या Tata Advanced Systems Limited ने विकसित केला आहे. या उपग्रहासाठी ग्राउंड स्टेशन बांधण्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. ग्राउंड स्टेशनवरूनच स्पाय सॅटेलाईटचे नियंत्रण केले जाईल आणि सब-मीटर रिझोल्यूशनची प्रक्रिया केली जाईल. एप्रिलमध्ये स्पेसएक्सच्या रॉकेटद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यासाठी हा उपग्रह फ्लोरिडाला पाठवला जाईल.
Tata Advanced Systems Limitedने लॅटिन अमेरिकन कंपनी सॅटेलॉजिकसोबत भागीदारी करून हा उपग्रह विकसित केला आहे. हा उपग्रह ०.५ मीटरपर्यंतच्या रेझोल्यूशनमध्ये छायाचित्रे घेऊ शकतो. यामुळे लष्कराला सीमेवर लक्ष ठेवण्यास आणि व्यूहात्मक निर्णय घेऊन लक्ष्य ठरविण्यास मदत होईल. या उपग्रहावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगळुरूमध्ये एक नियंत्रण केंद्र बांधले जात आहे. या नियंत्रण केंद्रातूनच उपग्रहाला नियंत्रित केलं जाईल. यासोबतच सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा टार्गेट लॉक करण्यासाठी लष्कराला आवश्यक असलेल्या छायाचित्रांवरही नियंत्रण केंद्रात प्रक्रिया केली जाईल. गरज भासल्यास हा उपग्रह मित्र देशांनाही उपयोगी पडू शकतो.
हे ही वाचा:
‘फारुख अब्दुल्ला मोदींना भेटत असत!’
अफगाणिस्तानात जिवंत लोकांचे फोटो काढण्यास मनाई
अखिलेश म्हणाले, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच समाजवादी ‘न्याय यात्रेत’ सहभागी होईल!
‘अश्विनचा घरी परतण्याचा निर्णय योग्यच!’
सध्या लष्कराला सॅटेलाइट इंटेलिजन्ससाठी अमेरिकन कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. इस्रोकडे सब-मीटर रिझोल्यूशन उपग्रह देखील आहेत, परंतु ते सैन्याच्या गरजेसाठी अद्याप पुरेसे नाहीत. कारण सैन्याला अनेकदा मोठ्या कव्हरेजची आवश्यकता असते आणि काहीवेळा ही गरज तातडीची असते. अशा स्थितीत या उपग्रहामुळे लष्कराचे परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होईल आणि डेटा लगेच उपलब्ध होईल.