अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या रॉबर्ट डुबोइस याला सन १९८३मध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे तब्बल ३७ वर्षे तो तुरुंगात होता. मात्र आता असे आढळून आले आहे की, हा गुन्हा त्याने केलाच नव्हता. त्यामुळे सरकारकडून त्याला तब्बल ११६ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.
१८व्या वर्षी रॉबर्ट याला पहिल्यांदा मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याच्यावर १९ वर्षीय बार्बरा ग्राम्स हिच्या हत्येचा आरोप होता. त्यानंतर त्याची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. आता रॉबर्ट हा ५९ वर्षांचा आहे. डीएनए चाचणीवरून असे स्पष्ट झाले आहे की, या गुन्ह्यात अन्य दोघांचा सहभाग आहे. त्यानंतर सन २०२०मध्ये रॉबर्टला तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर रॉबर्टने या प्रकरणाची चौकशी करणारे पोलिस पथक आणि फॉरेन्सिक दंत चिकित्सकावर खटला दाखल केला.
हे ही वाचा:
अंदमानच्या जंगलात मिळाले म्यानमारच्या सहा शिकाऱ्यांचे मृतदेह!
“शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास नसून मानवतेचा सुगंध”
माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन
फॉरेन्सिक दंत चिकित्सकाने पीडितेच्या शरीरावर आढळलेल्या दाताच्या खुणा रॉबर्टच्या दाताशी मिळत्याजुळत्या असल्याचे म्हटले होते. सन १९८०मध्ये डीएनए चाचणीची सुविधा नव्हती.ऑगस्ट १९८३मध्ये टम्पा शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करून बार्बरा ग्राम्स घरी जात होती. तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला होता आणि मारहाण करून तिची हत्या करण्यात आली होती. ग्राम्सच्या शरीरावर आढळलेल्या दातांच्या खुणांचा तपास करण्यासाठी अनेक पुरुषांचे नमुने घेतले गेले.
त्यात रॉबर्टचाही समावेश होता. मात्र आता असे आढळून आले आहे की ती मेणबत्तीची खूण होती. तर, फॉरेन्सिक दंत चिकित्सकाने ती खूण रॉबर्टच्या दाताची असल्याचे म्हटले होते. मात्र रॉबर्ट ग्राम्सला ओळखतही नव्हता. मात्र ग्राम्सचा जिथे मृतदेह मिळाला, तेथून तो ये-जा करत असे.