महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्मृती सोहळ्यानिमित्त लातूर येथे आयोजित कार्यक्रमात विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी भावपूर्ण भाषण केले. त्यात आपले काका आणि विलासरावांचे बंधू दिलीप देशमुख यांच्याशी असलेले नाते त्यांनी उलगडून दाखविले. त्यावरून महाराष्ट्रातील काका-पुतण्याच्या नात्याची चर्चा सुरू झाली. यावेळी विलासराव देशमुख यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले.
रितेश देशमुख म्हणाले की, विलासराव मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा लातूरला आले तेव्हा त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मांजरा सहकारी साखर कारखान्यातील या कार्यक्रमात आलेले असताना ते प्रथम मंचावर आपल्या बंधूंच्या (दिलीप देशमुख) पाया पडले. त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी भाषण सुरू केले.
रितेश देशमुख म्हणाले की, साहेब आज आपल्यात नाहीत पण काकांनी आम्हाला सदैव साथ दिली. गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे, हेच ते सांगत राहिले. त्यांच्याबद्दल बऱ्याचवेळा बोलता आले नाही पण आता सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचे नाते कसे असले पाहिजे याचे उदाहरण आज इथे सांगता येईल.
रितेश देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील काका पुतण्यांमधील संबंधांची चर्चा सुरू झाली. सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील ताणलेले संबंध, पक्षात झालेली फाटाफूट यावरून संघर्ष दिसून येत आहे. रितेश देशमुख यांच्या या वक्तव्याचा या संघर्षाशी संबंध जोडला जात आहे.
हे ही वाचा:
हाताला सूज आली, मग शरीर सुजले…’दंगल’फेम सुहानीच्या निधनाचे कारण आले समोर
योगी आदित्यनाथ लोकप्रियतेत दुसऱ्या स्थानावर!
कोटामध्ये १८ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता
शिवकालीन दांडपट्ट्याला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मिळणार दर्जा!
रितेश म्हणाले की, साहेब आणि दिलीप काकांनी एकमेकांना भाऊ म्हणून खूप जपले. आपल्या भावाला आपण कसे जपू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले.
रितेश देशमुख यांनी सध्याच्या काळात राजकारणी वापरत असलेल्या भाषेबद्दलही टीका केली. ते म्हणाले की, साहेबांचे वडील ज्यांना आम्ही बाबा (आजोबा) म्हणत असू. आपल्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी बाबांची भेट साहेबांनी (विलासराव) घेतली. तेव्हा निघताना बाबा म्हणाले की, मला थोडे बोलायचे आहे. त्यांनी आपल्याजवळ असलेल्या वर्तमानपत्रातील एक वर्तमानपत्र काढून त्यात विलासरावांचे छापलेले भाषण दाखवले. त्यात केलेली वैयक्तिक टीका त्यांनी दाखविली. तेव्हा बाबा म्हणाले की, राजकारणात अशी वैयक्तिक टीका करू नका.
सध्या राजकारणाचा स्तर इतका घसरला आहे की, तिथे अशा पद्धतीची खालच्या स्तराची भाषा अनेक राजकारणी वापरताना दिसतात.