25 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरसंपादकीयबारामतीत रंगणार पैठणीचा खेळ

बारामतीत रंगणार पैठणीचा खेळ

Google News Follow

Related

बारामतीचा किल्ला काबीज करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. बारामती ताब्यात घेतल्या वाचून थोरल्या पवारांचा संपूर्ण पराभव होणार नाही हे अजितदादांना माहित आहे. हा सामना पवार विरुद्ध पवार असाच होणार असून यंदाच्या निवडणुकीत इथे पैठणीचा खेळ रंगेल अशी शक्यता आहे.

महाराष्ट्रात पैठणीचा खेळ घरोघरीचे होम मिनिस्टर आदेश बांदेकर यांनी सुरू केला. परंतु, निवडणुकांच्या मौसमात महिला मतदारांना आकृष्ट करण्यासाठी या खेळाचे विविध पक्षांमार्फत किंवा उमेदवारांमार्फत मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. बारामती मतदारसंघात यंदा नणंद- भावजय असा चुरशीचा सामना होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे बारामतीत हा पैठणीचा खेळ रंगण्याची चिन्ह आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेले आहे. चिन्ह गेल्यामुळे संघटना संपत नसते ही थोरल्या पवारांची यावर दिलेली ताजी प्रतिक्रिया. बदलेल्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा थोरल्या पवारांना अनुभव आहे, त्यामुळे घड्याळ गेले तरी त्यांना चिंता नाही, असे ते कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. ही जशी एका पक्षातील लढाई आहे, तशी पवार परिवारातील लढाई आहे. ही लढाई लढताना थोरले पवार भावनिक तडका लावणार याची पुरेपुर जाणीव अजितदादांनाही आहे. त्यामुळे इथे परिवाराबाहेरचा उमेदवार उपयोगी नाही. अजितदादांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार बारामतीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. मतदार संघात सुनेत्रा पवारांचे होर्डींग आणि कटआऊट लागलायला सुरूवात झालेली आहे. त्या स्वतः मतदार संघाचा दौरा करतायत. महिलांसाठी पैठणीचे खेळ घेतायत.

इंदापूरमध्ये अशाच एका खेळासाठी शेकडो महिला एकत्र आल्या होत्या. त्यात सुनेत्रा पवारांनी अजितदादांसाठी उखाणाही घेतला. सुनेत्रा पवार या माध्यमांमध्ये चर्चेत नसल्या तरी पडद्याआडून अजित पवारांना साथ देण्याचे काम त्या अनेक वर्षे करतायत. त्यामुळे त्या राजकारण्यात नवख्या वगैरे नाहीत. त्यांना राजकारणाची जाण आहे, त्यांचा संपर्कही तगडा आहे. त्या जर बारामतीतून लढल्या तर सुप्रिया सुळेंना हा मतदारसंघ सोपा राहणार नाही. पैठणीचा हा खेळ आता कुठे सुरू झाला आहे.

२०२४ च्या निवडणुकांच्या आधी मोदी लाट दिसू लागली आहे. ही लाट २०१४ च्या निवडणुकीत होती त्यापेक्षाही मोठी झालेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने रासपाचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवले होत. जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार लढत दिली. दौंड आणि खडकवासला मतदार संघातून त्यांना आघाडी मिळाली. परंतु बारामती, इंदापूर, भोर आणि पुरंदरमधून सुप्रिया सुळे यांची बाजू सावरली. सुळे यांचा विजय झाला असला तरी ही निवडणूक चुरशीची झाली होती. २०१९ मध्ये भाजपाने कांचन कुल यांना इथून उमेदवारी दिली. त्यावेळी काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार यांना त्यांच्या घरी जावे लागले. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले पाटील आता भाजपामध्ये दाखल झालेले आहेत. भोर मतदार संघही काँग्रेसकडे आहे. इथे संग्राम थोपटे आमदार आहेत, परंतु थोरल्या पवारांशी त्यांचे सुरूवातीपासून सख्य नाही. बारामतीत स्वत: अजित पवार आमदार आहेत. पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत, परंतु इथे माजी मंत्री विजय शिवतारे यांचाही प्रभाव आहे. शिवतारे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.

बारामती हा पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे. इथून शरद पवार ६ वेळा, एकदा अजित पवार आणि सुप्रिया सुळे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु, २०२४ मधील समीकरणे पाहिली तर हर्षवर्धन पाटील यांचा भाजपा प्रवेश आणि अजित पवार यांचे भाजपासोबत जाणे यामुळे बारामतीची गढी टिकवणे सुप्रिया सुळे यांच्यासाठी सोपे नसेल. भोर मतदार संघातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे हे सुळे यांच्यासाठी फार ताकदीने उतरतील अशी शक्यता कमी आहे. सुप्रिया सुळे यांच्या हे लक्षात आल्यामुळे गेल्या सहा महिन्यात त्यांचे मतदार संघातील दौरे वाढले होते. गावागावात जाऊन त्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत असल्याचे गेल्या काही महिन्यांत वारंवार दिसत होते.

हे ही वाचा:

“पूर्वी मातोश्रीतून वाघाची डरकाळी ऐकू यायची; आता रडगाणी ऐकू येतात”

युक्रेनचे अवदिवका शहर रशियाच्या ताब्यात

शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरचा मृत्यू

अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण असेल याबाबत अजित पवारांनी उघड घोषणा केलेली नाही. परंतु, उमेदवाराचा चेहरा नवा असेल असे सुतोवाच करून त्यांनी सुनेत्रा यांनी उमेदवारी मिळू शकते याचे संकेत दिलेले आहेत. देशभरात विकासाच्या मुद्द्यावर कोणताही नेता किंवा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भिडू शकत नाही. त्यामुळे आरक्षणाचा लाडका मुद्दा तापवण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून सुरू आहे. २०१४ मध्ये बारामती मतदार संघात दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपाच्या महादेव जानकर यांना आघाडी होती, अन्य मतदार संघातही त्यांना चांगले मतदान झाले होते. कारण बारामती मतदारसंघात धनगर समाजाची मत चांगली आहेत. परंपरागत ही मते भाजपाला पडतात. थोरल्या पवारांनाही हे ठाऊक आहे, त्यामुळे त्यांनी धनगर आरक्षणाचे पिल्लू सोडून दिले आहे. धनगर, मुस्लीम आणि लिंगायतांना केंद्र सरकारने आरक्षण द्यावे. संसदेत भाजपाकडे बहुमत आहे, आम्हीही त्यांना सहकार्य करू असे शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार बारामती राखण्यासाठी जोर लावतील, वेगवेगळे मुद्दे उपस्थित करतील. परंतु, अजित पवार हा बारामतीतील एकमेव फॅक्टर शरद पवारांना भारी पडणार असे स्पष्ट चित्र आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील गल्लीबोळात अजित पवारांचा संपर्क आहे. सहकारी संस्था, पतपेढ्या, दूध संघ, कृषी पुरक उद्योगधंदे अन्य सहकारी संस्थांमध्ये अजित पवारांची जबरदस्त पकड आहे. अलिकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बारामतीत अजित पवार यांच्या गटाने ताकद सिद्ध केलेली आहे. गेल्या २० वर्षात अजित पवारांनी निर्माण केलेले जाळे मजबूत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजितदादांनी दिवस-रात्र एक केला नसता तर सुप्रिया सुळे यांचा विजय सोपा नसता. आता या मतदार संघातून अजितदादांच्या सौभाग्यवतींची होणारी चर्चा स्पष्ट करतेय की ते या मतदार संघाबाबत प्रचंड गंभीर आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींच्या झंझावातात टिकलेली बारामतीची गढी कोसळण्याचे काम अजित पवारच फत्ते करणार आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा