पुणे शहरातील ससून रुग्णालयातून एक कैदी फरार झाला होता. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती ११ फेब्रुवारी रोजी झाली होती. ललित पाटील ज्या पद्धतीने फरार झाला होता, त्याचं पद्धतीने आणखी एक कैदी फरार झाला होता. अखेर पोलिसांनी या कैद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कैद्याने गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मार्शल लुईस लीलाकर असं याचे नाव आहे.
ससून रुग्णालयातून पसार झालेल्या आरोपी मार्शल लुईस लीलाकर याला पोलिसांनी पहाटे पावणे दोनच्या सुमारास अटक केली. मार्शल हा ११ फेब्रुवारी रोजी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता. त्याने कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावर रीलद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर धमकीही दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मार्शल याला अटक केली होती.
हे ही वाचा:
भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांची निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक
अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाही
मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू!
मार्शल याला अटक केल्यानंतर येरवडा कारागृहामध्ये ठेवले होते. त्याने कारागृहामध्ये प्रकृती खराब असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्याला ससून रुग्णालयात पाठण्यात आले होते. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे केली. त्याला त्यानंतर तपासणीसाठी घेऊन पोलीस आले होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून मार्शल पसार झाला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर आणि गुन्हे शाखेचे पोलिस पथक नेरळ आणि कर्जत येथे पाठवण्यात आले होते. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.