उत्तरप्रदेशातील सहारनपूर भागातील गोटेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये असलेल्या प्राचीन विहिरीच्या उत्खननादरम्यान शिल्प आणि शिलालेख सापडले आहेत.तसेच उत्खननादरम्यान सुमारे ३०० वर्षे जुना शंखही या विहिरीत सापडला असून तो अतिशय जड आहे. विशेष म्हणजे हा शंख अजूनही वाजत आहे.सध्या या प्राचीन शिल्पांची चांगली स्वच्छता करण्यात येत आहे.तसेच विहिर आणखी खोदल्यास त्यातून आणखी प्राचीन शिल्पे सापडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मंदिरातील विहिरीतून प्राचीन मूर्ती बाहेर पडल्याची बातमी पसरताच आजूबाजूचे लोक जमा झाले.या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले.पथकाने मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सध्या हे उत्खनन थांबवले असून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला याची माहिती दिली आहे.
दरम्यान, गोटेश्वर महादेव मंदिराची काल साफसफाई सुरू होती.यावेळी मंदिराच्या परिसरात असणाऱ्या प्राचीन विहिरीचीही स्वच्छता करण्यात येत होती.त्यावेळी विहिरीत काही तुटलेल्या अवस्थेत मुर्त्या सापडल्या, ज्या खूप जुन्या दिसत होत्या.अशा परिस्थितीत सफाई करणाऱ्यांनी विहीर खोदली तेव्हा त्यांना आणखी शिल्पे आणि शिलालेख सापडले. यावेळी सुमारे ३०० वर्षे जुना शंखही सापडला. हा शंख बराच जड असून तो अजूनही चांगलाच वाजत आहे.
हे ही वाचा:
सर्व पिकांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी दिल्यास आर्थिक आपत्ती
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या निकटवर्तीयाच्या घरावर गोळीबार
‘चर्चेला तयार, परंतु नवीन मुद्दे आणणे थांबवा’
दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या जमिनीवर ‘आप’चे पक्ष कार्यालय!
याप्रकरणी सिद्धपीठ गोटेश्वर महादेव मंदिराचे सरचिटणीस व अध्यक्ष यांनी सांगितले की, हे मंदिर चारही बाजूनी बंद होते, परिसरातील लोकांनी या मंदिरावर कब्जा केला होता.त्यानंतर २०२० मध्ये मंदिराचा ताबा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी घेतला आणि त्या ठिकाणी एक रस्ता बांधला जेणेकरून तेथील स्थायिक मंदिराची पूजा करतील.त्यानंतर आमची मंदिर समिती गेली ३ वर्षे मंदिराची देखभाल, स्वच्छता आणि पूजा करतो.ते पुढे म्हणाले की, मंदिराच्या परिसरात एक जुनी मराठा कालीन विहीर आहे.विहिरीकडे पाहून आमच्या टीमला वाटले की त्यामध्ये नक्कीच पाणी असेल.त्या उद्देशाने विहिरीचे उत्खनन सुरु केले
परंतु, जसे विहिरीचे खोदकाम सुरू झाले तसे तिच्या आतून प्राचीन शिल्पे निघू लागली.त्यामध्ये शिवलिंग, नंदी महाराज, माँ पार्वती, हनुमानजी आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती आढळल्या. तसेच कदाचित या ठिकाणी खोदकामानानंतर एक दरवाजा निघेल, जो भुयारीमार्गाने मंदिरामध्ये प्रवेश करेल.कारण की, मराठ्यांच्या काळात चोरी आणि लुटारूंपासून वाचण्यासाठी असे भुयारी मार्ग बनवण्यात येत होते.त्यानुसार येथील मंदिराच्या पुजाऱ्याने गुप्त भुयारीमार्ग बनवला असेल, असे मंदिराचे सरचिटणीस म्हणाले.दरम्यान, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.सध्या विहीर खोदण्याचे काम बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील तपास प्रशासनाकडून होणार आहे.
दरम्यान, सुमारे शेकडो वर्षे जुने हे मंदिर मराठा काळातील असल्याचे सांगितले जात आहे. ही शिल्पे १५० वर्षांहून अधिक जुनी असल्याचे मानले जाते. मात्र, या मूर्तींचा इतिहास पाहणीनंतरच कळेल. हे मंदिर २०२० मध्ये उघडण्यात आले आणि नवीन मूर्तींना अभिषेक करण्यात आला.