भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने कठोर पावले उचलत काही भारतीय खेळाडूंना तंबी दिली आहे. आयपीएल सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या स्टार खेळाडूंना बीसीसीआयने फटकारले आहे. बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांनी भारतीय संघातून बाहेर असलेल्या खेळाडूंबाबत कठोर निर्णय घेतला आहे. भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीची पुढील फेरी खेळण्याच्या सक्त सूचना बोर्डाने दिल्या आहेत.
खेळाडूंना शिस्तीच्या दृष्टीने राज्य संघांमधील सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे सर्व खेळाडू रणजी ट्रॉफीच्या पुढच्या फेरीत खेळताना दिसणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय खेळाडू हे रणजीमध्ये खेळण्यास टाळाटाळ करत असल्याचे बीसीसीआयच्या लक्षात आले होते. यावर चाप बसवण्यासाठीच बीसीसीआयने कठोर निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
बीसीसीआयने १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील फेरीपूर्वी खेळाडूंना आपापल्या रणजी संघात सामील होण्यास सांगितले आहे. इशान किशन याने रणजी सोडून आयपीएलची तयारी सुरू केली. त्याचबरोबर श्रेयस अय्यरलाही कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रणजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. बीसीसीआयने अनेक खेळाडूंना मेल करत त्यांना रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या जे खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाहीत आणि त्यासोबतच जे खेळाडू बंगळुरूमध्ये नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत (NCA) रिहॅब होत आहेत अशा सर्व खेळाडूंना हा नियम लागू होत असल्याचं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, खेळाडू केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएलला प्राथमिकता देऊ शकत नाहीत, त्यांना देशांतर्गत क्रिकेटही खेळणं अनिर्वाय असणार आहे.
वैयक्तिक कारणांचा हवाला देत इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकाही खेळला नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले होते की, इशानला पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. असे असूनही, तो रणजी ट्रॉफी खेळला नाही. प्रशिक्षकाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून इशान बडोद्याला गेला आणि हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यासोबत सराव करताना दिसला. रणजी खेळण्याचा बीसीसीआयचा सल्ला केवळ इशान आणि श्रेयसलाच लागू होणार नाही, तर कृणाल पांड्या आणि दीपक चहरसारख्या खेळाडूंनाही लागू होईल, जे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाच्या योजनांमध्ये नाहीत.
हे ही वाचा:
बनावट हलाल सर्टिफिकेट देणाऱ्यांच्या उत्तर प्रदेश एसटीएफने आवळल्या मुसक्या
केरळच्या सत्ताधारी खासदाराने मोदींसह घेतले जेवण!
मंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले
रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन
बीसीसीआयकडून आलेल्या माहितीनुसार, खेळाडू त्यांच्या आवडीनुसार आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड करू शकत नाहीत. खेळाडूंना देशांतर्गत हंगाम आणि क्रिकेटचा भाग देखील असावा लागेल आणि त्यांना त्यांच्या राज्यातील संघांना प्राधान्य द्यावे लागेल.