हल्द्वानीतील बनभूलपुरा भागात ८ फेब्रुवारीला अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले प्रशासन आणि पोलिसांवर दगडफेक आणि गाड्या पेटवून देण्यात आल्या होत्या. या हिंसाचारादरम्यान पालिका आणि सरकारच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. याची तपासणी केल्यानंतर नगरपालिकेने मुख्य आरोपी अब्दुल मौलिक याला नुकसानभरपाईची वसुली करण्यासाठी नोटीस बजावली आहे. नगरपालिकेने आरोपीला १५ फेब्रुवारीपर्यंत अडीच कोटी नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. दिलेल्या मुदतीत नुकसान भरपाई न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
या हिंसाचारानंतर चार दिवसांनी मुस्लिम कुटुंबीयांनी जिल्ह्याच्या बाहेर सुरक्षित भागात पलायन करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे ५०० कुटुंब शहर सोडून निघून गेले आहेत. काही कुटुंबांनी पायीच सर्व सामान घेऊन वाट धरली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या भागात संचारबंदी असल्याने कोणतीही वाहने येथे ये-जा करत नाहीत.
या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली आहे. काही ठिकाणी संचारबंदी शिथिलही करण्यात आली आहे. मात्र बनभूलपुरा भागात अजूनही संचारबंदी कायम आहे. येथील लोकांना घरातच राहण्यास बजावण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने या भागातील सर्व ये-जा करण्याचे मार्ग सील केले आहेत. येथून लोक बाहेरही जाऊ शकत नाहीत किंवा आतही येऊ शकत नाहीत. दंगलखोरही या मार्गाने पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
हे ही वाचा:
इंडोनेशियातील फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडूवर वीज कोसळली
केरळच्या सत्ताधारी खासदाराने मोदींसह घेतले जेवण!
रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन
मंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले
‘मशिद हटवण्याचा निर्णय घिसाडघाईने’
जमियत उलेमा-ए-हिंदच्या प्रतिनिधीमंडळाने हल्द्वानीचा दौरा करून एसडीएमसोबत बैठक घेतली. तेव्हा त्यांनी प्रशासनासोबत चर्चा केली. तेव्हा जमियतचे सरचिटणीस अब्दुल रजिक यांनी मशिद पाडण्याचा निर्णय घिसाडघाईने घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाल्याचे सांगितले.