उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्र जारी करण्यावर कारवाई करताना ‘हलाल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे. हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली कथितपणे पैसे उकळल्याच्या आरोपाखाली अध्यक्ष, सरचिटणीस आणि खजिनदार यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. मौलाना मुईदशिर, हबीब युसूफ पटेल, मोहम्मद अन्वर खान आणि मोहम्मद ताहिर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
स्पेशल टास्क फोर्सच्या मते, हलाल कौन्सिल ऑफ इंडियाला कोणत्याही सरकारी संस्थेकडून मान्यता नाही आणि ते हलाल प्रमाणपत्र जारी करण्यास अधिकृत नाही. हबीब युसूफ पटेल (परिषदेचे अध्यक्ष), मुईदशिर (उपाध्यक्ष), मोहम्मद ताहिर झाकीर हुसेन चौहान (सरचिटणीस) आणि मोहम्मद अन्वर (कोषाध्यक्ष) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चार आधार कार्ड, चार पॅन कार्ड, तीन मोबाईल फोन, चार एटीएम कार्ड, तीन ड्रायव्हिंग लायसन्स, दोन मतदार कार्ड, एक आरसी आणि रोख २१ हजार ८२० रुपये जप्त केले आहेत. हलाल कौन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक सर्टिफिकेटसाठी १० हजार रुपये घेत होती, असे तपासात उघड झाले आहे. परिषदेला दाखले देण्याचेही अधिकार नव्हते.
हलाल प्रमाणपत्र मिळविण्याच्या संदर्भात कोणत्याही चाचण्या किंवा कोणत्याही प्रकारची चाचणी घेण्यात आली नाही. शिवाय, असे प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली केली गेली. याव्यतिरिक्त, उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स या निधीच्या वापराची चौकशी करत आहे.
हे ही वाचा:
कतारमधून भारतीय सकुशल मायदेशी परतण्यामागे मोदी, डोभाल यांचे मोठे पाऊल!
केरळच्या सत्ताधारी खासदाराने मोदींसह घेतले जेवण!
मंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले
रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन
‘हलाल प्रमाणपत्र‘ म्हणजे काय?
हलाल प्रमाणपत्र हे सुनिश्चित करते की, संबंधित उत्पादन इस्लामिक तत्त्वांचे पालन करते. कोणत्याही प्रकारच्या भेसळीपासून मुक्त आहे आणि त्यामध्ये प्राणी किंवा त्यांच्या उप-उत्पादनांमधून इस्लाममध्ये हराम मानले जाणारे कोणतेही घटक नसल्याची खात्री म्हणून याकडे पाहिले जाते. साधारणपणे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही उत्पादनांना हे प्रमाणपत्र लागू होते.