घाटकोपर पश्चिम येथील एका ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या माकड टोपी टोळीला पोलिसांनी शस्त्रासाठ्यासह अटक केली आहे. माकडटोपी घालून दरोडे टाकणारी ही खतरनाक टोळी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीवर एकट्या मुंबईत ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून दिवसा दुकानाची रेकी करून रात्रीच्या सुमारास दरोडा टाकून लाखोंचा ऐवज चोरी करणे ही कार्यपद्धती या टोळीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राजेश कदम हा (वय ३८) मूळचा रत्नागिरीचा सध्या कांदिवली येथे राहण्यास आहे. महावीर कुमावत (वय ३६) आणि हपुरम राजपुरोहित (वय २२) अशी दोघांची नावे आहेत हे दोघेही मूळचे राजस्थानचे राहणारे असून सध्या मिरारोड येथे राहण्यास होते या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या टोळीत जवळपास ८ सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे.
घाटकोपर पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना एमजी रोडवरील मोनालीसा ज्वेलर्स दुकानाच्या परिसरात तीन इसम माकड टोप्या घालून संशयास्पदरित्या फिरत असल्याचे गस्तीवरील पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या तिघांना हटकले असता तिघेही पळून जात असताना पोलिसांनी एका मोटारीसह तिघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या मोटारीची तपासणी केली असता मोटारीत मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले.
आरोपींची झडती घेतली असता त्यातील एकाककडे मोनालिसा ज्वेलरी शॉपचे व्हिजिटिंग कार्ड मिळून आले. हे तिघे आणि पळून गेलेले इतर चार सहकारी यांनी मिळून मोनालिसा ज्वेलर्स या दुकानावर दरोड्याची योजना आखली होती अशी माहिती चौकशीत समोर आली. या टोळीतील काही सदस्यांनी काही दिवसांपूर्वी खरेदीच्या निमित्ताने मोनालिसा ज्वेलर्स दुकानाची रेकी केली होती असे ही तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा:
अल जझीराचा पत्रकार मोहम्मद वाशाह निघाला हमासचा कमांडर
भारतातील उद्योग संघटना एक राष्ट्र, एक निवडणुकीच्या पाठीशी
“पंतप्रधान मोदींनी केलेल्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळे आम्ही मायदेशात परतू शकलो”
या टोळीकडे वाहनाच्या दोन नंबर प्लेट्स सापडल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या टोळीवर महाराष्ट्रसह गुजरात राज्यात दरोडयाचे गुन्हे असून एकट्या मुंबईत या टोळीवर ४० गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तुरुंगात असताना या दरोडेखोरांनी टोळी तयार केली होती, तुरुंगातून बाहेर पडल्यावर ही टोळी शहरात दरोडे टाकत होती. या टोळीचे वैशिष्ट्य म्हणजे ओळख पटू नये म्हणून माकड टोपी घालून ही टोळी दरोडे घालण्यात पटाईत आहे.