पश्चिम बंगालमधील तुरुंगातील महिला कैद्यांच्या अवस्थेबाबत कोलकाता उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कोठडीतील महिला कैदी गर्भवती राहण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तसेच, राज्यभरातील वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये १९६ बाळांचा जन्म झाल्याची माहिती अमाइकस क्युरीने न्यायालयासमोर सादर करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
पश्चिम बंगालच्या तुरुंगातील सुविधांबाबतच्या एका प्रकरणाशी संबधित माहिती सादर करताना हा उल्लेख करण्यात आला. मुख्य न्यायाधीश टीएस सिवाग्ननम आणि न्या. सुप्रतिम भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेगारी खटल्यांमध्ये निपुण असलेल्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुनावणीसाठी पाठवले आहे. महिला कैदी गर्भवती राहण्याचे प्रमाण रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचेही अमाइकस क्युरी (न्यायालयाचे सल्लागार) यांनी सुचवले आहे.
त्यासाठी महिला कैद्यांच्या इमारतीमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांना बंदी घालण्याचा प्रस्ताव २५ जानेवारी रोजी मांडण्यात आला आहे. तसेच, तुरुंगाच्या सुविधांमध्ये सुधारणा करावी तसेच, कैद्यांच्या कल्याणासाठी सुधारगृहातही काही महत्त्वाच्या सुविधा पुरवाव्यात अशाही शिफारसी या प्रस्तावात सादर करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा..
पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला, ५ पोलिसांचा मृत्यू!
फर्रुखाबादमधील रशीय मिया मकबरा पूर्वी शिव मंदिर होते?
पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंगांचे कौतुक!
रजिया सुलतानच्या काळात बांधण्यात आलेली ७०० वर्षे जुनी मशीद जमीनदोस्त!
सुधारगृहात असताना किती महिला कैदी गर्भवती राहिल्या, याची पाहणी जिल्हा न्यायाधीशांनी व्यक्तीशः भेट देऊन करावी, अशीही शिफारस करण्यात आली आहे. तसेच, महिला कैद्यांना तुरुंगात पाठवण्याआधी त्यांची गर्भवती चाचणी करावी, जेणेकरून त्यांचे सुधारगृहात होणारे लैंगिक शौषण टळू शकेल, असे निर्देश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व जिल्ह्यांना द्यावेत, असेही यात नमूद करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील सर्व पोलिस ठाण्यात गर्भवती चाचण्या कराव्यात. या संदर्भातील आदेश माननीय न्यायालयाने द्यावेत, असे अमाइकस क्युरीने सुचवले आहे.