अमेरिकेत अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे सध्या अमेरिकेत निवडणुकांचे वातावरण आहे. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्षांमध्ये प्रायमरी निवडणुका सुरु आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या भारतीय वंशाच्या उमेदवार निक्की हेली यांनी भारताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारत हुशार होत असून तो अमेरिकेवर विश्वास ठेवत नाही, असं त्यांनी केले आहे. तसेच अमेरिकेने भारतासोबत अधिक चांगले संबंध निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्या म्हणाल्या.
निक्की हेली म्हणाल्या की, “भारताला अमेरिकेचा भागीदार बनायचे आहे. परंतु, त्याला अमेरिकेच्या नेतृत्त्वावर विश्वास नाही. त्यामुळेच भारत रशियासोबत संबंध अधिक चांगले करत आहे. भारत हा आता हुशार होत आहे. भारताला अमेरिकेचा साथीदार बनायचं आहे, पण अमेरिका कितपत नेतृत्व करेल याबाबत त्यांना शंका वाटत आहे,” असं वक्तव्य त्यांनी फॉक्स बिजनेस न्यूजला एक मुलाखत देताना केलं.
“मी भारतासोबत व्यवहार केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला आहे. मोदी सरकार भागीदार देश बनण्यास इच्छुक आहे. त्यांना रशियासोबत जायचं नाही. पण, भारताला अमेरिकेच्या विजयावर शंका आहे. त्यांना वाटत नाही की आता अमेरिका नेतृत्व करु शकेल. भारताने याबाबत कायम हुशारी दाखवली आहे. त्यामुळे ते रशियाच्या जवळ गेले आहेत. कारण, तेथूनच त्यांना मोठ्या प्रमाणात लष्करी सामग्री मिळते,” असं त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
नांदेड: धार्मिक कार्यक्रमात जेवणानंतर तब्बल २००० लोकांना अन्नातून विषबाधा!
पाकिस्तान: बलुचिस्तानमध्ये दोन ठिकाणी स्फोट, २२ ठार!
‘काँग्रेसने नेतृत्वासाठी नेहरू-गांधी यांच्याशिवाय विचार करावा’
इंग्रजांचा प्रभाव असलेली काँग्रेस आऊटडेटेड
जेव्हा आपण पुन्हा यशस्वी नेतृत्व करु आणि आपला कमकूवतपणा दूर करु तेव्हाच आपले मित्र देश भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्राईल, जपान आणि दक्षिण कोरिया आपल्यासोबत ठामपणे राहतील. भारत चीनवरील अवलंबित्व कमी करुन आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने भारतासोबत अधिक चांगले संबंध निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं हेली म्हणाल्या.