भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणब मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या विचारधारेवर प्रश्न उपस्थित करून पक्षाने नेतृत्वासाठी नेहरू-गांधी कुटुंबीयांऐवजी विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच, प्रणब मुखर्जी यांना कोणीही चॅरिटी म्हणून पद दिले नव्हते तर त्यांनी पक्षातील पदे ही त्यांच्या बळावर मिळवली होती, असेही स्पष्ट केले.
‘सध्याच्या काँग्रेस पक्षाची विचारधारा काय आहे? निवडणुकीआधी केवळ शिवभक्त व्हायचे? काँग्रेस किंवा गांधी-नेहरू कुटुंबीयांनी माझ्या वडिलांना चॅरिटी म्हणून कोणतेही पद दिले नव्हते. ते त्यांनी स्वतः कमावले होते आणि ते त्या पदाच्या लायक होते. गांधी हे राजा आहेत का, की चार पिढ्यांनी त्यांच्यासमोर झुकले पाहिजे?’, असा प्रश्न त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला. त्यांनी काँग्रेसला त्यांच्या विचारधारेबाबत आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला. ‘काँग्रेस पक्षाचा गाभा असणारे बहुसंख्यत्व, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही तत्त्वे व्यवहारात पाळली जात आहेत का?,’ असा प्रश्न त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला. काँग्रेसच्या इंडिया आघाडीला त्यांनी ‘इंडि आघाडी’ असे संबोधले.
हे ही वाचा:
‘आरक्षणाच्या लाभार्थींना त्यातून बाहेर काढले पाहिजे’
पेपरफुटी आणि बनावट प्रश्नपत्रिकांना रोखणारे विधेयक लोकसभेत मंजूर!
काँग्रेस नेते, माजी मंत्री हरकसिंह रावत ईडीच्या रडारवर
गुगलची मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरील २,५०० लोन ऍप्स हटवले
‘जेव्हा ही आघाडी स्थापन झाली. तेव्हाच मी ‘एक्स’वर म्हटले होते की ती जेव्हा अपयशी ठरेल, तेव्हा काय मथळा असेल? ‘इंडिया मोडकळीस’. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नावाचे देशाच्या नावाशी साधर्म्य असता कामा नये,’ असे त्या म्हणाल्या.
शर्मिष्ठा यांनी सन २०१४मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी २०१५मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांनी सप्टेंबर २०२१मध्ये राजकारण सोडले होते.