26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरसंपादकीयहात नका लावू माझ्या दाढीला...

हात नका लावू माझ्या दाढीला…

शिंदेंच्या दाढीला हात घालण्याची ठाकरेंमध्ये ताकद कधी तरी होती का?

Google News Follow

Related

कोकण दौऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे नवनवे गौप्यस्फोट करतायत. पेण, माणगाव, राजापूरचा दौरा करून ठाकरे मजल दरमजल करत रत्नागिरीत दाखल झाले. मुख्यमंत्री पदाचा मोह नसल्यामुळे आपण गप्प बसलो, नाही तर आमदारांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवले असते आणि मिध्यांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंद्यांना दाढीला धरून खेचून आणले असते असा गौप्यस्फोट त्यांनी केला. दाढीवाल्यांशी पंगा घेऊन काय काय गमावले याचा हिशोब उद्धव ठाकरेंनी केला असता, तर अशी भाषा कदाचित केली नसती.

ठाकरेंच्या राजकीय कारकीर्दीचा सफाया दोन दाढीवाल्यांमुळेच झालेला आहे. त्यातला एक दिल्लीत बसतो. मोदी मला शत्रू मानतात, असे ठाकरे बरळत असले तरी मोदींनी ठाकरेंना मोजावे इतपत त्यांचे वजनही उरलेले नाही. ठाकरेंच्या कोकण दौऱ्याकडे बारकाईने पाहिले तर प्रश्न पडतो की, त्यांची आक्रमकता जास्त वाढते आहे? की पातळी घसरते आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशातील कोणताही नेता वापरत नाही, अशा प्रकारची भाषा उद्धव ठाकरे वापरतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही याला अपवाद नाहीत.

एकनाथ शिंदे यांच्या दाढीला धरून आपण आणले असते असे ठाकरे म्हणतायत. शिंदेंच्या दाढीला हात घालण्याची ठाकरेंमध्ये ताकद कधी तरी होती का? उद्धव ठाकरे यांच्या कृपेमुळे शिवसेनेतील अनेक लढवय्ये नेते बाहेर पडले. नारायण राणे गेले, राज ठाकरे बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेतील राडा संस्कृतीशी परिचय असलेला एकमेव चर्चेतला नेता त्यांच्यासोबत उरला. तो म्हणजे एकनाथ शिंदे. ज्यांनी कधी काळी रस्त्यावर उतरून संघर्ष केला होता. मार खाल्ला होता, मार दिला होता. तुरुंगवास भोगला होता. अशा नेत्याच्या दाढीला हात घालण्यासाठी काळीज लागते. हाती मुख्यमंत्री पद असतानाही ठाकरेंमध्ये ही धमक नव्हती.

जून २०२२ मध्ये शिवसेना फुटली असली तरी त्याचा टीझर फेब्रुवारी महिन्यातच रिलीज झाला होता. ९ फेब्रुवारी हा एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस. महाराष्ट्रात मविआची सत्ता असताना, ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री असल्याचे अनेक कटआऊट ठाण्याच्या वागळे इस्टेट, पाचपाखडी भागात लागले होते. तेव्हा तर एकनाथ शिंदे शिवसेनेत होते. ठाकरे त्यांचे पक्षप्रमुख होते. तेव्हा हात घालायचा त्यांच्या दाढीला. तेव्हाही धाडस केले नाही? काऱण कोरोनाचे निमित्त काढून ठाकरे कडी लावून घरी बसले होते तेव्हा शिंदे हेच शिवसेना चालवत होते. संघटनेसाठी पैसा पुरवत होते. पदाधिकाऱ्यांची आमदारांची कामे करीत होते. त्यामुळे त्यांना हात लावण्याचा विचारही ठाकरेंच्या मनाला शिवला नाही.

राज्यात पहिल्यांदा शिवशाहीचे सरकार आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. अनेकांना मनोहर जोशींचा कारभार पसंत नव्हता. नारायण राणे तर जोशींना हटवून मुख्यमंत्री होण्यासाठी प्रचंड उतावीळ झाले होते. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना त्या पदावर बसवले होते, याची जाणीव असल्यामुळे मनोहर जोशींच्या काळातही भावी मुख्यमंत्री असे कटआऊट लावण्याची कुणाची हिंमत झाली नव्हती. ठाण्यात लावण्यात आलेले कटआऊट एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी लावले होते, शिंदे यांना त्याची कल्पना नव्हती, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. राजकीय कार्यकर्त्यांना मोडायच्या आणि न मोडायच्या चौकटी कोणत्या याची पुरेपुर कल्पना असते. त्यावेळी शिंदे समर्थकांनी केलेली ही चाचपणीच होती. मुख्यमंत्री पदाला आव्हान देणाऱ्या शिंदेंचे ठाकरेंनी काय वाकडे केले?

आनंद दिघे यांच्या जीवनावर बेतलेला धर्मवीर सिनेमा ठाकरे पाहायला गेले होते. सिनेमा न पटल्यामुळे आणि न पचल्यामुळे सिनेमा अर्धवट सोडून गेले तेव्हाही शिंदेंच्या दाढीला हात घालण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे आता शिंदेंच्या दाढीला हात लावण्याच्या बाता करून त्यावर कोण विश्वास ठेवेल? एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडल्यानंतर ठाकरेंनी पक्षाचा मेकओव्हरच केला आहे. बुरखा घालेलेल्या महिला, गोल टोपी घातलेले दाढीवाले अलिकडे मोठ्या संख्येने ठाकरेंच्या सभेत दिसू लागले आहेत. रायगडच्या एका सभेत तर ठाकरेंना कुणी भेट म्हणून कुराण दिले. शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या दर्ग्याचा ठाकरे आवर्जून उल्लेख करतात. एकनाथ शिंदे नावाचा एक दाढीवाला पक्षात टीकवला असता तर या दाढीवाल्यांचा अनुनय करण्याची ठाकरेंना गरज पडली नसती.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊतला अटक!

वर्शिप कायदा रद्द करा

घाटकोपरमध्ये दगडफेक, मुफ्तीच्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी पाच जण ताब्यात!

चिलीच्या जंगलात भीषण वणवा

मोदींना शिव्या घालाव्या लागल्या नसत्या. काशीतील ज्ञानवापी मशिदीबाबत रोज नवे गौप्यस्फोट होत असताना त्याबाबत मौन बाळगावे लागले नसते. रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे पोटशूळ झालेल्या कट्टरवाद्यांनी मीरा रोडमध्ये हिंदू तरुणांना, भगिनींना मारहाण केल्यानंतर तोंडात तंबाखूची मळी धरल्याप्रमाणे गप्प बसावे लागले नसते. घाटकोपरमध्ये हिंदूविरोधी गरळ ओकणाऱ्या मौलवीला अटक झाल्यानंतर पोलिसांवर झालेल्या दगडफेकीबाबत मौन पाळावे लागले नसते.
एका दाढी वाल्याच्या अनुपस्थिती मुळे तुमच्या पक्षाची अशी अवस्था झालेली आहे. केंद्र सरकार लवकरच समान नागरी कायदा अमलात आणणार आहे. नागरीकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याबाबतही चाचपणी सुरू आहे. तेव्हाही ठाकरे तोंड बंद करून बसणार आहेत का?

एका शिंदेना टिकवले असते तर संभाजी ब्रिगेड, शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, निखील वागळे, असीम सरोदे, विश्वंभर आणि तमाम समाजवादी गँगच्या टेकूवर उभे राहण्याची वेळ आलीच नसती. त्यामुळे दाढीवाल्याच्या आणि त्याच्या दाढीच्या वाटेला न गेलेले बरे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा