ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी राजापूर येथे सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा तेच मुद्दे उपस्थित करत सत्ताधारी पक्षांवर टीका केली. आपले वडील चोरले, पक्ष चोरला याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
पंतप्रधानांबाबत पुन्हा संताप व्यक्त करताना उद्धव म्हणाले की, पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही. ते मला मानत आहेत. ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकटकाळात मदत केली त्या बाळासाहेबांची चोरी केली. चोराला मदत केली. त्याला मुख्यमंत्री बनवलं. नीतिश कुमार, केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तिकडे नीतीश कुमारांना फोडले. हेमंत सोरेनला तुरुंगात टाकले. केजरीवालांच्या मागे लागले आहेत. माझ्या राजन साळवी, रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, सूरज चव्हाण, अनिल परब आहेत त्यांना त्रास दिला जातोय, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
तळकोकणात गुंडगिरी न वाढण्यामागे विनायक राऊत आहे, असा तर्क मांडता ते म्हणाले की, विनायक राऊतांना लोकांनी दोनदा निवडून दिले नाहीतर इथेही गुंडागर्दी वाढली असती.
राजन साळवी यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीमुळे उद्धव ठाकरे व्यथित झाले आहेत. ते म्हणाले की, राजन साळवीच्या घरी धाड टाकली तेव्हा घरातील प्रत्येक वस्तूची किंमत लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता? तुम्हाला शरम वाटत नाही. तुमच्या सात पिढ्या जन्मल्या तरी महाराजांची किंमत करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे वडील आहेत असे म्हणत ते एकनाथ शिंदेंवर घसरले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना वडिलांची किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरत आहेत.
हे ही वाचा:
राहुल गांधींची यात्रा देशाचे नुकसान करण्यासाठी!
‘सातत्याने माझा सल्ला धुडकावल्यानेच तुरुंगात जाण्याची वेळ’
२०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यू जर्सीला!
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा असे म्हणत त्या गोळीबाराच्या घटनेवरून सुरू झालेल्या राजकारणातही उद्धव यांनी उडी घेतली. गायकवाडांनी केलेल्या आरोपांचा आधार घेत गायकवाड यांचे एकनाथ शिंदेंकडे कोट्यवधी रुपये आहेत, या वक्तव्यावर उद्धव ठाकरे बोलले.