काँग्रेसने त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात लागू केलेल्या मालवाहतूक समानीकरणाच्या धोरणांमुळे उत्तर भारतातील राज्ये विकासात मागे पडली, असा आरोप केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत हंगामी अर्थसंकल्प मांडल्यानंतर काँग्रेसचे खासदार डीके सुरेश यांनी दक्षिकेडील राज्यांना निधी न देण्याचा प्रकार सुरूच राहिल्यास स्वतंत्र देशाची मागणी केली जाईल, असा इशारा दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बोलत होते.
‘आज भारतातील नागरिकांना विशेषतः उत्तर भारतातील नागरिकांना हे जाणून घेणे गरजेचे आहे की उत्तर भारत विकासात दक्षिण भारताच्या मागे का आहे. त्याचे उत्तर म्हणजे सन २९५२पासून जवळपास १९९५पर्यंत, जवळजवळ ४० वर्षे काँग्रेस सरकारने मालवाहतूक समानीकरण धोरणाचा अवलंब केला. ज्यामुळे कंपन्यांना झारखंडमध्ये, बिहारमध्ये तसेच उत्तरेकडील राज्यांत गुंतवणुकीसाठी कोणतेही प्रोत्साहन मिळाले नाही,’ असा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा:
मुंबईबाहेरच्या रुग्णांना दुप्पट शुल्क हा अन्याय
यशस्वीचे द्विशतक, बुमराहचा षटकार; भारत सुस्थितीत
मॉर्गन स्टॅनलेकडून पेटीएमच्या २४४ कोटी किमतीच्या समभागांची खरेदी
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार डीपफेक व्हिडीओची शिकार
असे धोरण का राबवण्यात आले, असा प्रश्न झारखंड आणि बिहारसारख्या राज्यांतील नागरिकांनी काँग्रेसला विचारायला हवा. दक्षिण भारताने मालवाहतूक समानीकरण धोरणामुळे सर्व गुंतवणूक मिळविली. मग झारखंडसारख्या आणि बिहारसारख्या राज्यांतील जनतेने काँग्रेसला तुम्ही ५०-५५ वर्षे आमच्याशी असे का केले, असा जाब विचारायला हवा,’ असे ते म्हणाले.
‘आता दक्षिणेतील काँग्रेसचे खासदार उत्तर भारताला मदत करू नये असे म्हणत आहेत. हा तर काँग्रेसचा ढोंगीपणा आहे. काँग्रेसचा एक नेता ‘भारत जोडो’बद्दल बोलतो, तर दुसरा नेता ‘तोडो’बद्दल बोलतो. हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे,’ अशी टीका त्यांनी केली. डीके सुरेश यांच्या वक्तव्याने प्रत्येक भारतीयाला राग आला पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष तथाकथित जोडो यात्रा काढत आहे आणि आपल्या जोडो यात्रेबद्दल लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमचे वरिष्ठ नेते भारताचे विभाजन आणि दक्षिण भारताला उत्तर भारतापासून वेगळे करण्याविषयी बोलत आहेत,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले.