माहुल, चेंबूर येथील एजिस फेडरल वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानात एजिस फेडरल इन्शुरन्स कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. गणेश पालकर संघाने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
गणेश पालकर क्रिकेट क्लब या संघाने अंतिम फेरीत ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीवर पाच विकेट्सनी मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.यावेळी बोलताना मुंबईचे माजी फिरकी गोलंदाज आणि मुंबईच्या निवडसमितीचे सदस्य संजय पाटील म्हणाले की, वेंगसरकर यांचे क्रिकेट वरील प्रेम आणि निष्ठा याची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही आणि अशा महान व्यक्तीचा सहवास आणि मार्गदर्शन तुम्हा युवा खेळाडूंना लाभणे हे खरोखर भाग्याचे आहे. दरम्यान वेंगसरकर यांनी यावेळी बोलताना सध्या परीक्षांचा मोसम तोंडावर असताना आता मोबाईल किंवा अन्य गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता क्रिकेट आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स मिळवाल असा विश्वास व्यक्त केला.
गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला निर्धारित ३५ षटकांत ८ बाद १४२ धावांत रोखले. अथर्व कालेल (३३) आणि आरुष कोल्हे (६४) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांना फारशी चमक दाखविता आली नाही. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागी रचली होती. कर्णधार वेदांग मिश्रा याने २८ धावांत ३ तर सुरज केवत याने १४ धावांत २ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला रोखले.
हे ही वाचा:
अभिनेता थलपथी विजयचा राजकारणात प्रवेश!
मशीद कमिटीची याचिका फेटाळली, ज्ञानवापीत पूजा सुरूच राहणार!
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; आरोग्य, पायाभूत सुविधा, प्रदूषण नियंत्रण यावर भर
हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी
या आव्हानाचा पाठलाग करताना गणेश पालकर क्रिकेट क्लबने ५१ धावांत ३ बळी गमावले होते; पण अर्णव शेलार (नाबाद २७) आणि सन्मित कोथमिरे (१४) यांनी चौथ्या विकेटसाठी ४६ धावांची भागी रचून संघाचा विजय निश्चित केला. शिवम सम्राट (३७) आणि सिद्धांत सिंग (२०) यांनी देखील संघाच्या यशात खारीचा वाटा उचलला. ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा डावखुरा फिरकी गोलंदाज हमझा खत्री याने अप्रतिम गोलंदाजी करताना १९ धावांत ३ बळी मिळविले. मात्र त्याच्या गोलंदाजीचा कोटा संपला आणि प्रतिस्पर्धी संघाने नंतर आरामात धावा घेत संघाला विजयी केले.
अंतिम सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणेश पालकर सी.सी. संघाच्या कर्णधार वेदांग मिश्रा याची निवड करण्यात आली तसेच सर्वोत्तम फलंदाज आणि क्षेत्ररक्षक ( १४६ धावा आणि ६ झेल )ही दोन्ही पारितोषिके देखील त्यानेच पटकावली. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आयन गर्ग (७ बळी) याला गौरविण्यात आले. दिलीप वेंगसरकर, मुंबई क्रिकेट निवड समितीचे सदस्य संजय पाटील, खार जिमखानाचे अध्यक्ष विवेक देवनानी आणि एजिस फेडरलचे मुख्य व्यवस्थापक आनंद सिंग यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – ३५ षटकांत ८ बाद १४२ (अथर्व कालेल ३३, आरुष कोल्हे ६४; सुरज केवत १४ धावांत २ बळी, वेदांग मिश्रा २८ धावांत ३ बळी) पराभूत वि. गणेश पालकर क्रिकेट क्लब – २९.५ षटकांत ५ बाद १४३ (सिद्धांत सिंग २०, शिवम सम्राट ३७, अर्णव शेलार नाबाद २७; हमझा खत्री १९ धावांत ३ बळी). सामनावीर – वेदांग मिश्रा.