मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवार, २ फेब्रुवारी सादर करण्यात आला. गेल्या वर्षी पहिल्यांदाच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासकांकडून सादर करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्यामुळे यंदा सलग दुसर्या वर्षी प्रशासकांनीच अर्थसंकल्प सादर केला. २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प हा एकूण ५९९५४.७५ कोटी रुपयांचा आहे.
यंदाच्या मुंबई महापलिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण यावर मुख्य भर देण्यात आला आहे. मुंबईतील नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी ३१७७४.५९ कोटींची सर्वोच्च पायाभूत सुविधा तरतूद करण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्र्यांचे झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी’ सर्व पालिका रुग्णालयांमध्ये लागू होणार असून औषधांच्या वेळापत्रकात सर्व आवश्यक औषधं समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, १ हजार ६०० बचत गटांना प्रति गट १ लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी
नीतीशकुमारनंतर ममता बॅनर्जीही ‘इंडिया’तून बाहेर पडण्याच्या तयारीत!
झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकार!
अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!
मुंबई महिला सुरक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘बेस्ट’ला आर्थिक अनुदान म्हणून २२८.६५ कोटींची तरतूद आहे. मुंबईतील काही मोठ्या आणि विशेष प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यात कोस्टल रोड प्रकल्पासाठी २९०० कोटी, दहिसर- भाईंदर लिंक रोडसाठी (कोस्टल रोड शेवटचा टप्पा) २२० कोटी, गोरेगाव- मुलुंड लिंक रोडसाठी १८७० कोटी अशा काही प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच या प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे.