कामगिरीत सातत्य ठेवा आणि चांगल्या कामगिरीचा आनंद व्यक्त करताना फारसा उन्माद न करण्याचा सल्ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी आज ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या हर्ष गायकर याचा सत्कार करताना दिला. हर्ष गायकरने राष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे वेंगसरकर प्रभावित झाले आहेत. त्यांनी या सत्कारादरम्यान त्याचे कौतुक केले आणि त्याला प्रोत्साहित केले. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वतीने आयोजित १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करताना हर्षने फलंदाजी आणि गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करताना मुंबईला या स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.
तुम्ही जस-जसे वरच्या स्तरावर खेळत जाल तेव्हा कामगिरीत सातत्य ही गोष्टच सर्वात महत्वपूर्ण ठरणार असून त्यासाठी खेळात मनोनिग्रह, शिस्त आणि एकाग्रता या गोष्टी आत्मसात करण्याचा सल्ला वेंगसरकर यांनी दिला. खेळताना आक्रमक असायला हवे हे जरी खरे असले तरी ती आक्रमकता वृत्तीतून नव्हे तर आपल्या खेळातूनही दाखविता यायला हवी असे ही वेंगसरकर यांनी सांगितले. ओव्हल मैदानातील ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानात आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात वेंगसरकर यांच्या वतीने हर्ष गायकर याला संपूर्ण क्रिकेट किट देण्यात आले, यात क्रिकेट बॅट, पॅड्स, ग्लोव्हज ,थाय पॅड्स, आर्म गार्ड आणि किट बॅग यांचा समावेश होता.
हे ही वाचा:
भारतीय मेंढपाळ चिनी सैनिकांना भिडले: दिला ‘आवाज’
अर्थमंत्री सीतारामन गुरुवारी अर्थसंकल्प सादर करणार
डॉक्टर, नर्सच्या वेशात घुसून इस्रायली सैनिकांनी केला हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी १५ नागरिकांना मारले!
गेली ५-६ वर्षे ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरविणाऱ्या हर्ष गायकर याने नुकत्याच झालेल्या १६ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत ८ सामन्यात ८२९ धावा फाटकावताना दोन शतके आणि एक द्विशतकासह पांच अर्धशतके देखील केली होती. साखळीत त्याने विदर्भविरुद्ध २११ धावा तर आंध्र विरुद्धच्या लढतीत १०४ धावा केल्या होत्या. बाद फेरीत देखील त्याने राजस्थान विरुद्ध ११७ धावांची खेळी तर उपान्त्य फेरीत पंजाब आणि अंतिम फेरीत गुजरात विरुद्ध अर्धशतकी खेळी केल्या होत्या. याबरोबरच उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करताना त्याने स्पर्धेत १२ बळी देखील मिळविले होते.
क्रिकेटसाठी हर्षचा संघर्ष
हर्ष गायकर हा भिवंडीच्या पुढे आनगाव या छोट्याशा गावात राहत असून यंदा तो दहावीची परीक्षा देणार आहे. गावातून ओव्हल येथील क्रिकेट अकादमीत येण्यासाठी देखील त्याला तारेवरची कसरत करावी लागते. गावातून कल्याण पर्यंत आणि तेथून ट्रेनने व्ही.टी. असा दगदगीचा प्रवास त्याला करावा लागतो. गावातून कल्याण स्टेशन पर्यंत यायला फारशी सोय नसल्याने त्याचे वडील त्याला मोटर सायकल वरून कल्याण पर्यंत सोडतात आणि संध्याकाळी पुन्हा न्यायला येतात. त्याचे वडील गावात एक कॅन्टीन चालवायचे; पण मुलाच्या क्रिकेटच्या ध्यासामुळे त्यांना ती कॅन्टीन बंद करावी लागली. त्याची शाळा लाहोटी विद्यालय, आनगाव ही देखील घरापासून एक किलोमीटर असल्यानं त्याला चालताच शाळेत जावे लागते, शिवाय गावातील शाळा असल्याने तेथे क्रिकेट नसल्याने त्याला मुंबईत येण्याशिवाय पर्याय नाही. मात्र या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत तो आपल्या क्रिकेटचे वेड जोपासत असून गेल्यावर्षी देखील त्याने मुंबई संघातून खेळताना एक शतक केले होते. यंदा मात्र प्रत्येक सामन्यात त्याची धावांची भूक वाढतच गेलेली पाहायला मिळाली असून याच जिद्दीने पुढे खेळत राहा असा सल्ला वेंगसरकर सरानी त्याला दिला आहे. मात्र आत दहावीची परीक्षा एका महिन्यावर आलेली असल्याने आता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत.