माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी चित्रा यांच्या गाडीचा राजस्थानमधील अलवर येथे मंगळवारी अपघात झाला. त्यात चित्रा यांचा मृत्यू झाला असून ५९ वर्षीय मानवेंद्र जखमी झाले आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरून ते जयपूरहून दिल्ली येथे जात असताना हा अपघात झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत गाडीमध्ये त्यांचा २५ वर्षीय मुलगा हामिर सिंह आणि त्यांचा चालक होता. प्राथमिक तपासानुसार, गाडी मानवेंद्र स्वतः चालवत होते आणि त्यांची पत्नी त्यांच्या शेजारी बसली होती. तर, त्यांचा मुलगा आणि चालक मागे बसले होते. मात्र या एक्स्प्रेस वे वरील अपघात झाला, त्या पट्ट्यातील कॅमेरे नीट चालत नसल्याने अपघात नेमका कसा झाला, हे कळू शकले नाही. अलवरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक तेजपाल सिंह यांनी महिलेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या एसयूव्हीचे मोठे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा:
‘पंतप्रधान मोदी यांची माफी मागा’
छत्रपतींचा इतिहास; मोदी, शिववडा आणि शिवथाळी…
डॉक्टर, नर्सच्या वेशात घुसून इस्रायली सैनिकांनी केला हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी १५ नागरिकांना मारले!
मानवेंद्र सिंह हे सन २००४ ते २००९ दरम्यान राजस्थानमधील बारमेर-जैसलमेर मतदारसंघाचे खासदार होते. त्यांचे वडील जसवंत सिंह हे भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे सन २०२०मध्ये निधन झाले.
‘चित्रा सिंह यांना रुग्णालयात आणण्यात आले, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तर, मानवेंद्र सिंह यांच्या छातीला दुखापत झाली असून ते अद्यापही बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे,’ अशी माहिती डॉक्टरांनी दिली.