इस्रायलच्या लष्कराने डॉक्टर आणि परिचारिकांच्या वेषात वेस्ट बँकमधील जेनिन शहरातील रुग्णालयात घुसून हमासच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हल्ला झाला तेव्हा हमासशी संबंधित हे दहशतवादी झोपले होते.
वेस्ट बँकमधील जेनिन शहरातील इब्न सिना रुग्णालयात मंगळवारी ही घटना घडली. या अचानक केलेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉक्टर, परिचारिका आणि हिजाब परिधान केल्या महिलांच्या वेषात इस्रायलच्या सुरक्षा दलाचे काही सशस्त्र कमांडो रुग्णालयात प्रवेश करताना आणि हमासच्या तीन दहशतवाद्यांना लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे.
लष्कराच्या काही सैनिकांनी डॉक्टरचा कोटही परिधान केला आहे. तर, सर्जिकल मास्क परिधान केलेल्या एका व्यक्तीच्या हातात रायफल तर दुसऱ्या हातात व्हीलचेअर दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर इस्रायल सुरक्षा दलाकडून या हल्ल्याचे वृत्त देण्यात आले. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात सहभागी असणारा हमासचा दहशतवादी मोहम्मद जालामानेह यांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. हा दहशतवादी जेनिन शहरातील इब्न सिना रुग्णालयात लपला होता.
अल कासम ब्रिगेड या हमासच्या लष्करी गटाने जालामानेह हा त्यांच्या गटाचा सदस्य असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, सिना रुग्णालयात झालेल्या हल्ल्यात जालामानेह याच्यासह मोहम्मद आणि बासिल अयामान अल-गाझावी हे शहीद झाल्याचे जाहीर केले आहे. तर, या यशस्वी कारवाईबद्दल इस्रायलच्या मंत्र्यांनी त्यांच्या लष्कराचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा:
शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन
महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश!
छत्रपतींचा इतिहास; मोदी, शिववडा आणि शिवथाळी…
नाशिक: इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू!
इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यांनीही ही कारवाई फत्ते केल्याबद्दल त्यांच्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. इस्रायलने केलेल्या दाव्यानुसार, रुग्णालयात मारल्या गेलेले दोन जण भाऊ होते. ते वेस्ट बँकमधील सशस्त्र पॅलिस्टिनी गटाची संघटना जेनिन ब्रिगेडचे सदस्य होते.