शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशीही त्यांची वेगळी ओळख होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही अनिल बाबर यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहिली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दाखवला.
अनिल बाबर हे २०१९ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. अनिल बाबर यांनी अपक्ष उभे असलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर १९९०, १९९९, २०१४, २०१९ असे चार वेळा आमदार झाले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते.
पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची ‘पाणीदार आमदार’ अशी ओळख आहे. खानापूर-आटपाडी हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून त्यांनी यासाठी जोरकस प्रयत्न केले. या योजनेला त्यांनी टेंभू योजना असे नाव दिले.