भारताविरोधात घेतलेल्या भुमिकेनंतर मालदीवची आणि मालदीवमधील सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू हे सध्या अडचणीत आले आहेत. मालदीवमधील विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रेटिंक पार्टीने (एमडीपी) मुईझ्झू सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. तसेच मुईझ्झू यांच्याविरोधात महाभियोग दाखल करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. त्यामुळे चीन धार्जिणे मुईझ्झू यांचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महाभियोग दाखल करण्यासाठी खासदारांचे पुरेसे संख्याबळ असावे म्हणून विरोधी पक्षांच्या बैठका होत आहेत. शिवाय अविश्वास प्रस्तावावर खासदारांनी सह्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मालदीवच्या संसदेत लवकरच चीन समर्थक राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
नुकतेच मालदीवच्या संसदेत बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांच्या मंत्रिमंडळात चार मंत्र्यांची नेमणूक करण्यासाठी रविवार, २८ जानेवारी रोजी संसदेत मतदान होणार होतं. परंतु, विरोधी पक्षाने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. मालदीवमध्ये पीपल्स नॅशनल काँग्रेस (PNC) आणि प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (PPM) हे दोन पक्ष सत्तेत आहेत. तर माजी अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) हा पक्ष विरोधात आहे. विरोधात असलेल्या पक्षाचे मालदीवच्या संसदेत सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त खासदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांच्या बहुमताच्या जोरावर विद्यमान अध्यक्ष मुईझ्झू यांच्या मंत्र्यांच्या नेमणुकीदरम्यान अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणजे खासदारांमध्ये झालेली हाणामारी.
मालदीवच्या घटनेनुसार, महाभियोगाचा प्रस्ताव पहिल्या सभागृहाने दोन-तृतीयांश बहुमताने पारित केला तर तो प्रस्ताव दुसऱ्या सभागृहाकडे पाठवला जातो. दुसऱ्या सभागृहातील सदस्य या आरोपांची चौकशी करतात. यावेळी अध्यक्षांनाही आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो. त्यानंतरही दुसऱ्या सभागृहातील दोन-तृतियांश सदस्यांनी हा प्रस्ताव पारित केला, तर तो प्रस्ताव पारित करण्याच्या तारखेपासून राष्ट्रपतींना पदावरून बाजूला केले जाते.
हे ही वाचा:
मोदी सरकारचा मोठा निर्णय, आणखी पाच वर्षे सिमीवर बंदी!
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा म्हणजे राजकीय पर्यटन
‘मम्मी, पापा, मी जेईई पास होऊ शकत नाही, राजस्थान येथील १८ वर्षीय मुलीची आत्महत्या!
मुलांच्या स्कोअरकार्डवरून अन्य मुलांशी तुलना करू नका!
महाभियोग म्हणजे काय?
शासनातील उच्चपदस्थ व्यक्ती तसेच अधिकारी यांनी केलेला गुन्हा, गैरवर्तणूक, संविधान भंग किंवा कर्तव्यपालनातील अक्षम्य हेळसांड याबद्दल रीतसर आरोप ठेवून विधिमंडळाने चालविलेला खटला म्हणजे महाभियोग.