पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत जवळपास २.०५ कोटी विद्यार्थी. १४.९३ लाख शिक्षक आणि ५.६९ लाख पालकांनी नोंदणी केली होती. यावेळी पालकांना आपल्या मुलांशी वागताना कोणती काळजी घ्यावी तसेच त्यांच्या गुणांवरून अन्य विद्यार्थ्यांशी त्यांची तुलना अजिबात करू नका, असा महत्त्वपूर्ण सल्ला पंतप्रधानांनी दिला.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी भारतीय पंतप्रधानांना परीक्षेचा दबाव कसा कमी करायचा याबद्दल प्रश्न विचारले. या त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, परीक्षा पे चर्चा या मागच्या सहाही सीझनमध्ये हाच प्रश्न विचारला गेला आहे. यावरून असे दिसून येते की प्रत्येक बॅचसाठी ही समस्या वारंवार येत आहे, किवा ही समस्या सामुहिक आहे. यासाठी आपण प्रथम आपल्याला मजबूत बनवले पाहिजे. आव्हान पेलण्यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर असायला हवे. उष्ण हवामानात राहणारे लोक थंड ठिकाणी जाण्याआधी स्वतःची मानसिक तयारी कशी करतात, तशीच तयरी आपण केली पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, दबाव हे दोन प्रकारचे असतात. एक असतो तो आपण स्वतः तयार करतो आणि दुसरा सामाजिक परिस्थितीशी निगडीत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वास्तववादी उद्दिष्टे ठेवावीत. अभ्यासाचा बोजा करून घेऊ नये. विद्यार्थांना आपले पालक, भावंडे तसेच शिक्षक यांच्याकडून सुद्धा अपेक्षांचे ओझे सहन करावे लागते.
हेही वाचा..
लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख ठरली!
भगव्या झेंड्यावरुन कर्नाटकात काँग्रेस-भाजप आमनेसामने!
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर!
राज्यात २ लाख ७६ हजार कोटींची गुंतवणूक
स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, स्पर्धेअभावी जीवन निस्तेज होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्रांशी स्पर्धा न करता स्वत:शी स्पर्धा करावी. कारण नंतरच्या शैक्षणिक कामगिरीचा त्यांच्या निकालावर परिणाम होणार नाही. पालकांनीही त्यांच्या मुलाची तुलना त्यांच्या बॅचमधील इतर मुलांशी, भावंडांशी करणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मित्रांच्या आणि बॅचमेटच्या चांगल्या शैक्षणिक कामगिरीपासून प्रेरणा घ्यावी. जर तुमच्या मित्राने ९० गुण मिळवले, तर असे नाही की तुम्हाला फक्त १० गुण मिळतील. तुम्हाला अजून १०० गुण मिळायचे आहेत. ही तुमची मानसिकता असायला हवी असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी पालकांना उद्देशून म्हणाले, त्यांच्या मुलांनी परीक्षेत चांगले गुण मिळविल्यानंतर त्यांचे स्कोअरकार्ड व्हिजिटिंग कार्ड म्हणून बदलू नयेत. जेव्हा काही विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करतात, तेव्हा त्यांचे पालक त्यांचे स्कोअरकार्ड त्यांचे व्हिजिटिंग कार्ड म्हणून दाखवतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अशी भावना निर्माण होऊ शकते की त्यांना सर्व काही माहित आहे आणि ते जगातील सर्वोत्तम आहेत. हे योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले. शिक्षकांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शिक्षकाचे काम केवळ शिकवणे किंवा विद्यार्थ्यांना यशाच्या मार्गावर नेणे एवढेच मर्यादित नसते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्याशी घट्ट नाते निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे नाते असे असावे की विद्यार्थ्यांना त्यांच्याशी बोलण्यास किंवा त्यांच्यासमोरील समस्यांवर चर्चा करण्यास संकोच वाटत नाही. शिक्षक-विद्यार्थी गतिमानता बदलत आहे आणि हे नाते आता अभ्यासक्रमापुरतेच मर्यादित राहिले आहे, अशी व्यथा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. आजकाल विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना त्यांच्या परीक्षेच्या ताणाबद्दल बोलण्यासाठी फोन करत नाहीत. संवाद त्यांच्या विषयापुरता मर्यादित आहे असे त्यांना वाटते. ज्या दिवशी विद्यार्थ्यांना विश्वास असेल की ते आयुष्यातील प्रत्येक समस्येसाठी त्यांच्या शिक्षकांपर्यंत पोहोचू शकतात, तेव्हा तणाव आपोआप नाहीसा होईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी ठळकपणे सांगितले.
परीक्षेपूर्वी सरावाचे महत्त्व..
‘परीक्षा पे चर्चा’ च्या ७ व्या सिझनमध्ये पंतप्रधान मोदींनी परीक्षेपूर्वी लेखनाचा चांगला सराव करण्याच्या गरजेवर भर दिला. विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बराच वेळ घालवतात आणि कागदावर लिहिण्यापासून त्यांचा संपर्क तुटला आहे, अशी महत्वाची टिप्पणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव करण्यास, चुका ओळखण्यास आणि स्वतःची उत्तरे दुरुस्त करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचावी, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या प्रशांना अधिक वेळ लागतो याबद्दलची रणनीती ठरवण्यास मदत होईल.
आरोग्य महत्वाचे आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. जर विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक नसेल, तर ते त्यांच्या परीक्षेचे ३ तास बसू शकणार नाहीत. आपल्या फोनप्रमाणेच आपल्या शरीरालाही रिचार्ज करणे आवश्यक आहे. दररोज काही तास सूर्यप्रकाशात बसण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे शरीर रिचार्ज होण्यास मदत होईल. पुस्तकासह काही वेळ घराबाहेर घालवावा, असेही त्यांनी सुचवले. याशिवाय कुटुंबांनी दर महिन्याला एकत्र यावे आणि काही प्रेरक पुस्तके आणि चित्रपटांबद्दल बोलले पाहिजे. यामुळे कुटुंबात सकारात्मकता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होते. कुटुंबात, विशेषत: बेडरूममध्ये आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी ‘नो-गॅजेट झोन’ असण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. एका कुटुंबातील सदस्य त्यांच्या घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये मोबाईल फोनला चिकटवलेले कसे दिसतात याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले.