मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होते शिवाय त्यांचा मोर्चा मुंबईत दाखल होणार होता, मात्र, नवी मुंबईत असतानाच मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे हे आंदोलन थांबले, दरम्यान, नवी मुंबईतील वाशीमध्ये दाखल झालेल्या मराठा आरक्षणाच्या मोर्चात तुफान गर्दी जमली होती. लाखोंच्या संख्येने लोक जमले होते आणि या जमलेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी उचलला. गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी हात सफाई करून सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन लंपास केल्याची माहिती आहे.
चोरट्यांनी ९ जणांचे तब्बल १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि तीन जणांचे मोबाईल फोन असा तब्बल पावणे चार लाखांचां ऐवज लंपास केल्याचे उघडकिस आले आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय या चोरट्यांचा .शोध घेण्याचे कामही सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना ते मुंबई अशी पायी पदयात्रा काढली होती. ही पदयात्रा शुक्रवारी सकाळी नवी मुंबई दाखल झाली होती. या पदयात्रेमध्ये राज्यभरातील लाखो मराठा बांधव हजारो वाहनांसह सहभागी झाले होते. गर्दीमुळे थोडाफार गोंधळ उडाला होता आणि याच दरम्यान चोरट्यांनी संधी साधून मौल्यवान गोष्टी लंपास केल्या.
हे ही वाचा:
उत्तराखंडमधील मदरशांमध्ये रामायण शिकवणार
प्रभादेवीच्या प्रभावती मातेच्या जत्रेला सुरुवात
जामनेरमध्ये ’नमो कुस्ती महाकुंभ’; देणार व्यसनमुक्तीचा मंत्र
‘इतिहासात काय नाव लिहून जाणार, नितीश कुमार?’
ऐरोलीतून या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले संजीव पिंगळे (वय ५५ वर्षे) तसेच कोपरखैरणेतून आलेले प्रल्हाद जाधव या दोघांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केली. त्यानंतर पिंगळे आणि जाधव यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढे चोरट्यांनी संधी साधून आणखी ७ जणांच्या गळ्यातील सोन्याची चैन तसेच तीन जणांचे मोबाईल फोन चोरले.