अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या दिमाखात झाली. त्यावेळी संपूर्ण देशासह जगभरात सर्व वातावरण हे राममय झाले होते. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता उत्तराखंडमधील मदरशांमध्येही रामायण शिकवले जाणार आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले की, “वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या ११७ मदरशांमध्ये आम्ही मुलांना संस्कृत शिकवू आणि मुलांना रामायणाचे धडेही शिकवू जेणेकरून मुले त्यांच्या संस्कृतीशी जोडली जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या इतिहासाचे भान असले पाहिजे. या मुलांना संस्कृतबरोबरच वेद, पुराण, रामायणही शिकता येईल.”
याआधी उत्तराखंडमधील मदरशांमध्ये मुलांना संस्कृत शिकवण्याचीही चर्चा होती. त्याला विरोध झाला होता. मात्र, आता मदरशांमध्ये रामायण शिकवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मदरसा बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी घोषणा केली आहे की, बोर्डाच्या अंतर्गत शिकणाऱ्या ११७ मदरशांमध्ये मुलांना रामायण शिकवले जाणार आहे.
हे ही वाचा:
प्रभादेवीच्या प्रभावती मातेच्या जत्रेला सुरुवात
जामनेरमध्ये ’नमो कुस्ती महाकुंभ’; देणार व्यसनमुक्तीचा मंत्र
‘इतिहासात काय नाव लिहून जाणार, नितीश कुमार?’
परदेशी म्हटल्याबद्दल अधीर रंजन यांच्याकडून तृणमूलच्या डेरेक ओब्रायन यांची माफी
याशिवाय मदरशांमध्ये रामायण शिकवण्यासाठी म्हणून विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून श्रीरामाच्या चारित्र्याची ओळख करून दिली जाणार आहे. मदरशांमध्ये रामायण वाचल्याने मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल, असा विश्वास शम्स यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयाला विरोध होत असला तरी, या निर्णयाची अंमलबजावणी थांबवता येणार नाही असंही ते म्हणाले.