काठी न घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी जत्रंला येऊ द्या की हे लोकगीत आठवतंय का? पण, जत्रा म्हटल्या की त्या गावाकडच्या असं समजू नका. मेट्रो सिटी अशी ओळख बनलेल्या मुंबई शहरातही पूर्वापार अनेक जत्रा भरतात. मुंबापुरी आज कितीही बदलली असली तरी आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. त्यातलीच प्रभादेवी येथील प्रभावती मातेची जत्रा उत्साहात भरलेली आहे.
ज्या देवीच्या नावावरून प्रभादेवी परिसराला प्रभादेवी हे नाव पडले, तीच ही प्रभावती मातेची जत्रा. पौष पौर्णिमा, अर्थात शाकंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रभादेवीच्या या जत्रेला प्रारंभ होतो. प्रभादेवी मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. अखंड प्रभादेवीचा परिसर उत्साहाने दुमदूमन जातो. प्रभादेवी जत्रेतील दुकाने दुपारनंतर उघडतात आणि रात्रीपर्यंत हा परिसर उत्साहात न्हाऊन निघतो.
सिद्धीविनायक मंदिरापासून हाकेच्या अंतरावर न्यू प्रभादेवी मार्ग आहे. याच मार्गावर प्रभावती मातेचे पुरातन मंदिर आहे. मंदिरात प्रभावती मातेसह चंडिका आणि कालिका मातेचे स्थान आहे. मंदिराच्या आवारात खोकलादेवी, हनुमान, शिवशंकर विराजमान आहेत.
मुंबादेवी, प्रभावतीदेवी, शीतलादेवी, काळबादेवी, हरबादेवी, माहेश्वरीदेवी या मुंबईच्या तारणहार. त्यांच्यावरील श्रद्धेपोटी या देवतांच्या जत्रा मुंबईत भरतात. या जत्रांना काही वर्षांचा इतिहासही आहे. मुंबईतल्या गिरणी कामगारांचे पगार १० तारखेला व्हायचे. त्यामुळे शक्यतो या जत्रा १० ते १५ तारखेच्या दरम्यान लागायच्या. अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये या जत्रा भरताहेत. एकदा जत्रेच्या गर्दीत गेलो, की आपण स्वत:ला विसरुन जातो. जत्रेत खेळता-खेळता ती जत्राच आपल्याला हवी तशी कशी खेळवते हे लक्षातही येत नाही.
या जत्रेत नाना प्रकारचे स्टॉल्स लावले जातात. खेळण्यांचे, दागदागिन्यांचे, बांगड्या, खेळणी, पाण्यावर चालणारी बोट, पिपाण्या, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया, टोपी, कपडे, खाजा, पेठा, हलवा, बर्फी, चिक्की, वेगवेगळ्या चवीच्या पाणीपुरी, लोणची-पापड, मुखवास, फुगे, पर्स-पाकिटं असं खूप काही जत्रांमध्ये मिळतं. मनोरंजनासाठी पाळणे, चक्री पाळणे, टंपोली, ट्रेन, ड्रॅगन ट्रेन, टोरा-टोरा, रिंग टाकून हवी असलेली वस्तू मिळवण्याची संधी देणारी दुकानं, बंदुकीनं फुगे फोडण्याचा स्टॉल इथे लागलेले दिसतात. हजारो लोकांचा उदारनिर्वाह या जत्रेवरच चालतो. लहान-मोठे सगळेच या जत्रांमध्ये हरवून जातात. पाळण्यात बसून मोठ्यानं आरडाओरडा करणं, मोठ्यानं पिपाणी वाजवणं सुरू असतं.
अलीकडच्या काळात जत्रा कमी झाल्या आहेत.
हे ही वाचा:
जामनेरमध्ये ’नमो कुस्ती महाकुंभ’; देणार व्यसनमुक्तीचा मंत्र
‘इतिहासात काय नाव लिहून जाणार, नितीश कुमार?’
परदेशी म्हटल्याबद्दल अधीर रंजन यांच्याकडून तृणमूलच्या डेरेक ओब्रायन यांची माफी
१६ व्या वर्षी पुस्तक लिहिले; ३० मिनिटांतच संपली पहिली आवृत्ती
जुन्या चाळी जमीनदोस्त होऊन त्या जागेवर टॉवर्स उभे राहताहेत. चाळींत राहणारा मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आहे. त्यामुळे जत्राही कमी झाल्या आहेत. तरीही गिरगाव, दादर, लालबाग सोडून गेलेली माणसं दरवर्षी न चुकता सहकुटुंब जत्रेला हजेरी लावतात. नव्या पिढीतल्या काहींना आता जत्रांमधल्या पाळण्यापेक्षा अम्युझमेंट पार्क जवळची वाटू लागलेत. तिथले महागडे तिकीट दर सगळ्यांनाच परवडत नाहीत. जत्रांमधल्या आकाशपाळण्याची मजा कुठल्याही पार्कात नाही. जत्रा भरली की आनंदात हरवून जावयासं वाटतं. तो सुखावणारा असतो.