गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जात आपले मुख्यमंत्रीपद टिकविणारे जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार आता भाजपासोबत पुन्हा येण्याची शक्यता असून २८ जानेवारीला ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते सुशील मोदी हे त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी जितन राम मांझी यांचे पुत्र संतोष मांझी यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याचे वृत्त आहे. पण संतोष मांझी यांनी स्पष्ट केले आहे की, आपण एनडीएशी कोणतीही प्रतारणा करणार नाही.
नितीश कुमार यांच्या नाराजीनंतर लालूप्रसाद यादव यांनी वेगवेगळे प्रयोग विचारात घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सत्ता टिकविण्यासाठी त्यांना १२२ चा आकडा गाठायचा आहे. जर नितीश कुमार यांनी साथ सोडली तर राष्ट्रीय जनता दल अर्थात लालू प्रसाद यांना आणखी ८ आमदारांची गरज भागेल.
सुशील मोदी यांनी यासंदर्भात सांगितले की, जे दरवाजे बंद होते ते आता उघडले आहेत. राजकारणाचा खेळ हा शक्यतांचा आहे. मोदी यांनी यापुढे मात्र अधिक माहिती देणे टाळले.
हे ही वाचा:
‘ज्ञानवापीच्या जागी भव्य मंदिर होते’
प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झळकला ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ’!
हबल दुर्बिणीने शोधला सूर्यमालेबाहेरील पाण्यासह एलियन ग्रह!
पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
भाजपातील सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाने पटना भाजपाला असे आदेश दिले आहेत की, बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक ती पावले उतला. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दोन दिवसांच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. ही बैठक २७ जानेवारीला सुरू होत आहे. शनिवारी तावडे हे पटनामध्ये येणार आहेत. त्याआधी भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार जर भाजपासोबत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे ट्विट केले होते.
सध्या बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दोन पक्षांचे इथे सरकार आहे. समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न घोषित झाल्यानंतर हा दुरावा आणखी वाढला. त्यातच नितीश कुमार यांनी परिवारवादावर टिप्पणी केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी नितीश कुमारांवर टीका केली पण नंतर ते ट्विट हटवले.
काँग्रेसही या सगळ्या घटनाक्रमाकडे लक्ष ठेवून आहे. त्यांनी म्हटले आहे की, नितीश कुमार जर पुन्हा भाजपाकडे येत असतील तर ते सोपे नाही. सध्या नितीशकुमार बिहारमधील आघाडीत कंटाळलेले आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.